डोंबिवली (प्रशांत जोशी): काही राज्यांमध्ये लहानपणापासून केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग यांच्या स्पर्धा परीक्षांचे महत्व पालकांकडून बिंबवले जाते. त्यामुळे अशा राज्यातून आयुक्त आणि जिल्हाधिकारी घडत असतात. महाराष्ट्रातील पालकांनी अशा स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या पाल्यांना तयार करावे. जेणेकरून येथील तरुण मोठ्या संख्येने अधिकार पदावर पोहचतील. तसेच देशाला शास्त्रज्ञ व संशोधकांची गरज आहे त्या दृष्टीनेही विद्यार्थांनी प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.
पूर्वेकडील होली एजल स्कूल येथील वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या महापौर विनिता राणे, होली एंजल स्कूलचे संस्थापक ओमेन डेव्हीड, लीला ओमेन, मुख्याध्यापक बिजॉय ओमेन, सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे, स्थानिक नगरसेविका रुपाली म्हात्रे, माजी सरपंच रवी म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिंदे पुढे म्हणाले, आम्ही शाळेत शिकत असतांना फारशा सुविधा मिळत नव्हत्या. परंतु अशा शाळेत शिकून अनेक जण मोठ्या पदापर्यंत पोहचले आहेते. बदलत्या मागणीनुसार आजच्या शाळांची संकल्पना बदलली आहे. सीबीएससी किंवा आयसीएससी शाळांच्या प्रवेशासाठी झुंबड झाली आहे. कारण या शाळांबाबातची परिभाषा बदललेली आहे. चांगल्या पायाभूत सुविधा ज्या शाळांमध्ये आहेत त्या शाळांबाबत निर्णय घेतला जातो. चांगल्या शाळा समाजात येत आहेत आणि चांगली कामे करीत आहेत. होली एंजल स्कूल गेली 29 वर्षे चांगली सुविधा देण्याचे काम करीत आहे आणि त्यातील शिक्षक शैक्षणीक सेवा देण्याचे काम करीत आहेत. शाळा, ज्यूनियर कॉलेज, सीनियर कॉलेज अशी या संस्थेची प्रगती झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात संस्थेने नावलौकिक मिळविला आहे. काळ बदलला आहे संशोधनात व स्पर्धा परीक्षामध्ये मोठी संधी आहे. देशाला चांगले वैज्ञानिक हवे आहेत. आजचे विद्यार्थी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत असल्याने त्यांना चांगल्याप्रकारे वर्तमान गोष्टीची माहिती असते त्यामुळे शिक्षकांनीही अद्ययावत असणे गरजेचे आहे.
यावेळी ओमेन डेव्हीड म्हणाले, विद्यार्थांनी अभ्यास कसा करावा याचे तंत्र शिक्षकांनी शिकवावे. आमच्या शाळेत देशाचा भावी नागरिक घडविण्याचे काम केले जाते. शाळेचा व महाविद्यालयाचा रिझल्ट शंभर टक्के लागतो यामध्ये शिक्षक व विद्यार्थ्याचे योगदान आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी खेळ, कला, मनोरंजन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळी गाठली आहे. नृत्य आणि गाण्याच्या माध्यमातून समाजाला संदेश देणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शाळा व महाविद्यालयात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. आपल्या मुलांचे कौतुक पाहण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती.