डोंबिवली, (प्रशांत जोशी) : सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून सरकारी आस्थापना, सैन्य, पोलीस आदी सुरक्षा यंत्रणाना लक्ष्य करून राजकीय सत्ता ताब्यात घेणे हेच माओवादी विचारसरणीचं ध्येय आहे असे प्रतिपादन कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी केले.
अभ्युदय प्रतिष्ठान संचालित नाना ढोबळे स्मृती ग्रंथालयानी पूर्वेकडील ठाकूर हॉल येथे आयोजित केलेल्या ‘शहरी नक्षलवाद एक वास्तव’ या विषया गायकवाड बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, समाजातील बुद्धिजीवी वर्ग म्हणजे वकील, पत्रकार, साहित्यिक, कलाकार, विविध स्तरातील बुद्धिजीवी व्यक्ती यांची फळी आपल्या बाजूने उभी करून सामान्य जनतेच्या मनात शासन यंत्रणा, लोकशाही, स्वदेश यांबद्दल संभ्रम निर्माण करणे हा माओवाद्यांच्या व्यापक रणनीतीचा एक भाग आहे.
तर दुसऱ्या सत्रात तुषार दमागुडे यांनी ‘सोशल मीडिया ऍक्टिविझम’ या विषयावर मार्गदर्शन केले. संगणक व इंटरनेटच्या सर्वत्र उपलब्धतेमुळे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडिया द्वारे आपली मतं लादणाऱ्यांना सोशल मीडियामुळे हादरा बसला. परंतु सोशल मीडियाचा वापर करताना जबाबदारीने करावा. अफवा पसरवू नयेत, तेढ निर्माण करू नये. संविधानाच्या चौकटीत राहूनच नक्षलवादाविरुद्ध जे जे करणं शक्य शक्य आहे ते करावे असे आवाहन त्यांनी केले.
सदर व्याख्यानाला डोंबिवलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापालिकेचे स्थायी समिती सभापती राहुल दामले, व्याख्यात व लेखक सच्चीदानंद शेवडे आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष अच्युत कऱ्हाडकर व उपाध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्या हस्ते वक्त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय फाटक यांनी केले.