० वाॅल क्लायम्बिंगमध्ये पुणेकर सरस
० योगासन स्पर्धेत खेडची तन्वीला सुवर्ण, चिपळूणची आर्याला रौप्य
रत्नागिरी :
चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे सुरु असलेल्या एसव्हीजेसिटीच्या डेरवण युथ गेम्सचा सातवा दिवस गाजविला तो योगासन चॅम्पियनशिपच्या मुलांनी. १० ते १६ वर्षे वयोगटातील मुलांनी सादर केलेली योगासनांची एकापेक्षा एक प्रात्याक्षिके पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. धनुर्विद्या विभागात सोलापूरच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व गाजविले. तर वाॅल क्लायम्बिंग स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंचे निर्विवाद वर्चस्व दिसून आले. योगासन स्पर्धेत खेडची तन्वी रेडीजला सुवर्ण, चिपळूणची आर्या तांबेला रौप्य पदक मिळाले. रत्नागिरीचा मिलन मोरेने कांस्यपदक मिळविले.
डेरवण येथील क्रीडा महोत्सवाचा शुक्रवारी सातवा दिवस होता. या दिवशी योगासन, अॅथलेटिक्स,धनुर्विद्या, कॅरम या स्पर्धा रंगल्या. धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने स्टेडीयममध्ये उपस्थित होते. योगासनांची स्पर्धा इनडोअर स्टेडीयममध्ये रंगली. इचलकरंजी, पुणे, नाशिक,चिपळूण, रत्नागिरी, निपाणी येथून आलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय योगपटू यांनी यात आपला सहभाग नोंदविला. १२ वर्षे वयोगटात मुले आणि मुलींची संख्या मोठी होती.
बद्धहस्तवृश्चीकासन,द्विपादगोखीलहस्तवृश्चीकासन,व्याघ्रासन, संख्यासन, पद्मबकासन,नटराजासन या आसनांचे सादरीकरण केले. महाराष्ट्र राज्याच्या संघाला राष्ट्रीय शालेय योगासन स्पर्धेत गेली ४ वर्षे पदक प्राप्त करून देणारे प्रज्ञा गायकवाड, तन्वी रेडीज, आर्या तांबे, सेजल सुतार, रुई घाग, सिद्धी हुब्ळे यांनीही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला.
सोलापूरच्या चौघांना पदक
इंडियन, रिकव्हर आणि कम्पाउंड या तीन प्रकारात धनुर्विद्या ही स्पर्धा खेळविण्यात आली. सोलापूरच्या एकूण ४ खेळाडूंनी पदके पटकाविली. १० वर्षे वयोगटातील इंडियन या धनुष्य प्रकारात मुलींमध्ये शर्वरी शेंडे, पुणे हिने प्रथम क्रमांक मिळविला. वैयक्तिक प्रकारात १४ वर्षे वयोगटातील इंडियन या प्रकारात मुलांमध्ये रोशन दोरगे (प्रथम), अनिकेत गावडे (द्वितीय) आणि राहुल वसेकर (तृतीय) क्रमांक पटकाविला. कम्पाउंड प्रकारात मुलांमध्ये रंजन बर्डे (प्रथम),युवराज भोसले (द्वितीय) आणि पृथ्वीराज साळुंखे याने तिसरा क्रमांक मिळविला, मुलींमध्ये तनिष्का जाधव (सोलापूर, प्रथम),जान्हवी साटम द्वितीय तर अदिती गरडने (सोलापूर) तृतीय क्रमांक पटकाविला. रिकव्हर गटामध्ये स्मित शेवडे (प्रथम, डेरवण),शोमिक सावंत (सातारा), मानस संकपाळ (तृतीय, डेरवण) हे यशस्वी ठरले.
पुणेकर सरस
वाॅल क्लायम्बिंग स्पर्धेत १८ वर्षे वयोगटात साहिल जोशी, मुलींमध्ये सानिया शेख. १४ वर्षे वयोगटात मुलांमध्ये अर्णव खानझोडे,मुलींमध्ये अनन्या अनभुले या पुण्याच्या खेळाडूंनी बाजी मारली.
अॅथलेटिक्समध्ये ठाणेकर चमकले
अॅथलेटिक्स विभागात मुलांच्या १८ वर्षे गटात लांब उडी स्पर्धेत रोहन कांबळेला (कोल्हापूर) सुवर्ण,शुभम जगतापला (सांगली) रौप्य, मुश्रफ खानला (पुणे) कांस्य पदक मिळाले. मुलीच्या गटात साक्षी पाटीलला सुवर्ण, अश्विनी वेलान्डीला रौप्य तर अनुजा वाल्हेकरला कांस्य पदक मिळाले. ४ बाय ४०० रिले स्पर्धेत मुलींच्या अचिव्हर्स स्पोर्ट्स क्लबला (ठाणे) सुवर्णपदक मिळाले. सिद्धेश्वर चॅम्पियन,कोल्हापूर या संघाने रौप्य आणी अचिव्हर्स स्पोर्ट्स क्लब एने (ठाणे) कांस्यपदक पटकाविले.
डेरवण शाळेच्या स्वरा गुजरचे यश
डेरवण येथील शाळेची विद्यार्थिनी असलेल्या स्वरा गुजरने १२ वर्षाखालील गटात सुवर्णपदक जिंकले. पतियाळा येथे झालेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत ती सहभागी झाली होती. सहावीत असलेली ही विद्यार्थिनी सावर्डे गावची आहे. दुर्गम भागात राहत असताना आणि योगाविषयी आवश्यक तेवढे प्रशिक्षण मिळत नसतानाही तिने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे. डेरवणच्या मानस सकपाळने रिकव्हर गटात तृतीय क्रमांक पटकावीत कांस्यपदक पटकाविले. धनुर्विद्या रिकव्हर गटामध्ये डेरवणच्या स्मित शेवडेने प्रथम पटकाविला.