प्रलंबित सहकारी प्रकरणांच्या तातडीने निपटाऱ्याचे आश्वासन; वकिलांसाठी स्वतंत्र बार रूमची मागणी
कोकण वृत्तसेवा | नवी मुंबई | दि. 9 जुलै
महाराष्ट्र शासनाने उपनिबंधक, सहकारी संस्था (सिडको), नवी मुंबई या पदावर नियुक्त केलेले डॉ. सुनील कोठावळे यांचे नवी मुंबई को-ऑपरेटिव्ह ॲडव्होकेट असोसिएशनच्या वतीने बुधवारी (दि. ८) शाल, पुष्पगुच्छ तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित “जनता” हे पुस्तक भेट देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.
यानंतर झालेल्या बैठकीत निबंधक कार्यालयातील दैनंदिन कामकाज, सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न, सभासद, वकील, ऑडिटर्स, प्राधिकृत अधिकारी, निवडणूक अधिकारी तसेच सहकार क्षेत्रातील विविध प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेले दावे, अर्ज, अपील आणि इतर प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यात यावा, अशी मागणी उपस्थित वकील बांधवांनी केली. तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कमतरता, त्यातून निर्माण होणारा कामकाजावरील ताण आणि नागरिकांना होणारा विलंब याबाबतही उपनिबंधकांचे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी डॉ. सुनील कोठावळे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या SIR (Special Intensive Revision) विशेष मतदार यादी पडताळणी अभियानाची माहिती प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्था आणि नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व वकील बांधवांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
निबंधक कार्यालयात वकील, ऑडिटर्स, प्राधिकृत अधिकारी, निवडणूक अधिकारी तसेच नवी मुंबई हाऊसिंग फेडरेशन यांच्या समवेत नियमित आढावा बैठका घेऊन प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्यात येईल. पुढील १५ ते २० दिवसांत प्रलंबित प्रकरणांचा कायदेशीर चौकटीत आढावा घेऊन त्यांचा शक्य तितक्या लवकर निपटारा करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन डॉ. कोठावळे यांनी दिले.
सिडको परिसरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या तक्रारींचे पारदर्शक, न्याय्य व कायदेशीर पद्धतीने निराकरण करण्यात येईल. तसेच उच्च न्यायालय आणि सहकार विभागाच्या आदेशांचे काटेकोर पालन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत वकिलांसाठी निबंधक कार्यालयात स्वतंत्र बार रूम उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. सुनावणीसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत असल्याने तसेच महत्त्वाच्या कागदपत्रांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही सुविधा आवश्यक असल्याचे वकील बांधवांनी सांगितले.
या बैठकीस नवी मुंबई को-ऑपरेटिव्ह ॲडव्होकेट असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. चंद्रकांत निकम, सचिव अॅड. डी. पी. साळुंखे तसेच असोसिएशनचे पदाधिकारी आणि वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहकार क्षेत्रात समन्वय, पारदर्शकता आणि लोकाभिमुख प्रशासनाला प्राधान्य देण्याची ग्वाही डॉ. सुनील कोठावळे यांनी दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी असोसिएशनच्या वतीने डॉ. सुनील कोठावळे यांना पुढील यशस्वी व लोकाभिमुख कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
















