नवी मुंबई : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय डेंग्यु दिवसाचे औचित्य साधून डेंग्यू आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महापौर श्री. जयवंत सुतार व महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी दिंडी यात्रेचे घणसोली, तळवली, गोठिवली, राबाडे भागात आयोजन करण्यात आले होते.उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे यांच्या सन्माननीय उपस्थितीत घणसोली येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून या दिंडीला प्रारंभ होऊन घणसोलीतील गावदेवी चौक, घणसोली गांव, तळवली, गोठिवला या मार्गाने नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र राबाडे येथे या दिंडीची सांगता करण्यात आली. याप्रसंगी फ प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. अनिता मानवतकर, आरोग्य समिती उप सभापती श्रीम. वैशाली नाईक, नगरसेवक श्री. निवृत्ती जगताप, श्रीम. कमलताई पाटिल, श्रीम. सिमा गायकवाड, श्री. घनश्याम मढवी, सहा. आयुक्त श्री. दत्तात्रय नागरे, मुख्यालयातील वैद्यकिय अधिकारी डॉ. उज्वला ओतुरकर, नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. वैशाली म्हात्रे (घणसोली), डॉ. अशोक जाधव (नोसिल नाका), डॉ. वर्षा तळेगांवकर (राबाडा), डॉ. भावना बनसोडे (कातकरीपाडा) आदी मान्यवर उपस्थित होते.या वारकरी दिंडीमध्ये आरोग्य पर्यवेक्षक, सर्व आरोग्य सहाय्यक, सर्व बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांच्यासह डास आळी नाशक फवारणी कामगार व तांत्रिक पर्यवेक्षक मोठ्या संख्येने सहभागी होते. दिंडीसारख्या पारंपारिक लोकप्रिय माध्यमाचा वापर करून डेंग्यूचा आजार कशाप्रकारे होतो, डेंग्यू होऊनच नये याकरीता काय काळजी घ्यावी, डेंग्यू झाल्यावर कोणते उपचार घ्यावेत, कुटुंबिय व परिसरातील नागरिकांना करावयाच्या उपाययोजना याबाबत व्यापक स्वरुपात माहिती प्रसारित करण्यात आली. यामध्ये नागरिकांना डेंग्यू आजाराबाबत डास आळी व डासांची उत्पत्ती स्थाने याविषयीची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. प्रदर्शन संच, हस्तपत्रके वितरण, पोस्टर्स बॅनर्स अशा विविध प्रकारे आरोग्य शिक्षण देऊन डेंग्यू या आजारापासून संरक्षण करण्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे यांनी नागरिकांना घरात व आजुबाजुच्या परिसरात पाणी साचून डास उत्पत्ती होणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन केले, तसेच डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांची महानगरपालिकेच्या वतीने अंमलबजावणी केली जात असताना सहकार्य करण्याचे आवाहन केले. डेंग्यू तापाची लक्षणे ही अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळ्यांच्या मागे दुखणे अशा इतर विषाणूजन्य गंभीर तापाच्या लक्षणांसारखीच असतात. रक्त स्त्रावीत डेंग्यू ताप ही या आजाराची गंभीर अवस्था असून याची सुरुवात तीव्र तापाने होत असते व सोबतच डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे तसेच पोटदुखी ही लक्षणे असतात. डेंग्यू ताप हा कमी अधिक असा वेगवेगळ्या तीव्रतेचा असू शकतो. नवी मुंबई महानगरपालिकेची रुग्णालये तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे याठिकाणी डेंग्यू आजारावर मोफत उपचार उपलब्ध आहेत याची नागरिकांनी नोंद घ्यावयाची आहे. डेंग्यू आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये याकरीता नागरिकांनी आठवड्यातून किमान एक वेळा घरातील पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करून पाणी साठविलेल्या भांड्यांना योग्य पध्दतीने व्यवस्थित झाकून ठेवावे तसेच घरासभोवतालची जागाही स्वच्छ आणि कोरडी ठेवावी त्याचप्रमाणे घराच्या भोवताली व छतांवर वापरात नसलेले टाकावू साहित्य ठेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे.नवी मुंबई हे आपले स्वच्छ व सुंदर म्हणून नावलौकीक प्राप्त शहर आरोग्यपूर्णही असावे याकरीता आरोग्य विभाग महापौर श्री. जयवंत सुतार व महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवित असून पावसाळी कालावधीच्या आधी येणा-या राष्ट्रीय डेंग्यू दिवासाचे औचित्य साधून आज डेंग्यूसह पावसाळा कालावधीत आजार होऊ नयेत याकरीता घ्यावयाच्या काळजी विषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली.