डोंबिवली,(प्रशांत जोशी) : कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रात अनधिकृत बांधकामे, पाणी प्रदूषण, वायूप्रदूषण, घाणीचे साम्राज्य, रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे, शासकीय रुग्णालयात डॉक्टरांची कमतरेमुळे अपुऱ्या वैद्यकीय सेवा आणि लाचखोर भ्रष्ट अधिकारी अशा अनेक समस्यांनी येथील नागरिक ग्रासले आहेत. माजी नगरसेवक तथा काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी संतोष केणे यांनी कडोंमपाच्या सद्य अर्थहीन स्थितीचा लेखाजोखा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. या लेख्याजोख्याच्या निष्कर्षानुसार कल्याण डोंबिवली महापालिका बरखास्त करा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनद्वारे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्याकडेही हा प्रश्न मांडण्यात आला असून महापालिकेतील गैव्यवहार आणि नागरी सुविधांचा खालावत असलेला दर्जा या विषयी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. राखीव भूखंडावर उभारलेली शासकीय व प्रशासकीय कार्यालये, 251 शाळा आणि 362 रुग्णालयांची अनधिकृत बांधकामे. महापालिकेतील रंगेहात पकडलेले लाचखोर भ्रष्ट अधिकारी सुनील जोशी, सु. रा. पवार, गणेश बोराडे, संजय घरत यांच्यामुळे पालिका प्रतिदिन चर्चेचा विषय होत असून नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. पिण्याचे पाणी प्रदूषित असल्याच्या कारणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. वायू प्रदूषणात पालिका परिक्षेत्र प्रथम क्रमांकावर आहे. वायू गळतीमुळे झालेल्या स्फोटात 11 जण मृत्यूमुखी पडले. 27 गावांना पालिकेत समाविष्ट करूनही या गावांचा विकास करण्यात पूर्णतः फोल ठरले आहे. विशेष म्हणजे 27 गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीवर या गावांतील मतदार नागरिक ठाम आहेत या विषयासह शहरात घाणीचे साम्राज्य आणि रस्त्यातील खड्डे याचबरोबर शास्त्रीनगर व रुक्मीणीबाई हॉस्पिटलमधील अपुऱ्या वैद्यकीय सेवांमुळे ठाणे किंवा मुंबईची करावी लागणारी रुग्णांची वारी दिवसेंदिवस त्रासदायक ठरत आहे यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 452(1) नुसार बरखास्त करावी असे केणे यांनी दिलेल्या प्रत्रात नमूद केले आहे. या पत्रानुसार पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कल्याण डोंबिवली महापालिका बरखास्त करा अशी मागणी केली आहे.