सिंधुदुर्ग : भात लागवडीची श्री पद्धत मोठ्या प्रमाणात यशस्वी होण्यासाठी यांत्रिकीकरणाची नितांत गरज आहे. याच अनुषंगाने चांदा ते बांदा अंतर्गत लावणी, काढणी, कोळपणी आदी यंत्र सामुग्री तसेच टॅक्टर, पुरविण्याची योजना ७५ टक्के अनुदानावर चांदा ते बांदा अंतर्गत राबविली जात आहे. या चांदा ते बांदा अंतर्गत यांत्रिकरणाचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपली शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर करुन उन्नत्ती साधावी, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे केले.
दिलासा जन विकास प्रतिष्ठान, अधिक्षक कृषी कार्यालय सिंधुदुर्ग व रत्नाकर बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी नगरपरिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित शेतकरी जाणीव जागृती मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री केसरकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी उदय चौधरी, अधिक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव शेळके, दिलासा संस्थेच्या अध्यक्षा डॉ. अनघा पाटील, सचिव संजीव उन्हाळे, रत्नाकर बँकेचे कृषी विभाग प्रमुख मनोज रावत उपस्थिदत होते.
श्री पद्धत शेतकऱ्यांची चळचळ व्हावी
भात लागवडीतून किफायतशीर शेती यशस्वी होण्यासाठी श्री पद्धत अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की, श्री पद्धतीने हमखास दिडपट भाताचे उत्पादन मिळते. खरीप व रब्बी हंगामाचा विचार करता भात उत्पादन वाढीने भात विक्रीतून आर्थिक संपन्नता प्राप्त होण्यासाठी निश्चित हातभार लागणार आहे. यासाठी जिल्ह्यात कृषी सखी याच्या माध्यमातून श्री पद्धतीने भात लागवड ही चळवळ झाल्यास भातशेतीमधून शेतकऱ्यांचा भरीव आर्थिक विकास होईल. जागतिक बँकेच्या सहकार्याने राष्ट्रीय जीवन्नोन्नत्ती अभियानांतर्गंत कृषी सखींची मानधनावर गावो-गावी नेमणुका केल्या आहेत. या कृषी सखींनी श्री पद्धत तसेच शेती यांत्रिकीकरणाचा सुयोग्य पद्धतीने प्रचार करुन शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करण्याचा प्रयत्न करावा. या मेळाव्याच्या निमित्ताने मिळालेल्या माहितीचा सदुपयोग करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी उदय चौधरी यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, आर्थिकदृष्ट्या शेती किफायतशीर करायची, खरीप व रब्बी हंगामात श्री पद्धतीने भात लागवड करायची आणि दुप्पट उत्पादन हमखास मिळवायचा असा दृढ संकल्प व निश्चय प्रत्येक शेतकऱ्यांनी आज करायला हवा. भात हे प्रमुख पिक आहे. याच बरोबर फळझाड लागवड तसेच आंतरपिक म्हणून मसाल्याची पिक घेण्याचाही आपण सर्वांनी आज संकल्प करूया.
दिलासा संस्थेच्या अध्यक्षा डॉ.अनघा पाटील यांनी श्री पद्धतीने भात लागवड करण्याच्या पद्धतीची सविस्तर माहिती दिली. प्रास्तविक सचिव संजीव उन्हाळे यांनी केले.
यावेळी श्री पद्धतीने भाताचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्वश्री मधुसुदन गवस- हेवाळे, चंद्रकांत सडेकर, विजय सावंत- सावंतवाडी, उमेश भालेकर, भिवा गावडे, शांताराम तेली, राजाराम पालेकर, विठ्ठल निकम, चंद्रकांत चव्हाण, दीपक सुर्वे या शेतकऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या शेतकऱ्यांनी प्रती गुंठा ११५ किलो ते १४१ किलो भाताचे उत्पादन घेतले.
या शेतकरी जनजागृती मेळाव्यास जिल्ह्यातील महिला बचत गटाच्या प्रतिनिधी, कृषी सखी, कृषी विभागाचे तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.