डोंबिवली, (प्रशांत जोशी) : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांनी “यह आजादी झुठी है। देश की जनता भुखी है । हा नारा दिला होता. आजही देशाची विदारक स्थिती तशीच आहे. देशातील पन्नास टक्के जनता अर्धपोटीच रहाते यामुळेच अण्णाभाऊ साठे यांचा नारा देशाला तंतोतंत लागू पडत असल्याचे वक्तव्य बसपाचे प्रदेश सचिव, दयानंद किरतकर यांनी केले.
लोकशाहिर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची 98वी जयंती डोंबिवली येथील देशमुख होम्स यथे बसपाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अण्णाभाऊंना अभिवादन करताना दयानंद किरतकरांनी आपले विचार व्यक्त केले. सदर कार्यक्रमास बसपाचे लोकसभा महासचिव संजय जाधव, सुनील मडके, विनोद भालेराव, गायक दिनकर शिंदे, सुशील आर के, विजय सोनावणे, सचिन कसबे, सुभाष साबले आदी मान्यवर उपस्थित होते.
अण्णाभाऊंच्या कार्याची महती सांगताना किरतकर म्हणाले की, अण्णाभाऊ यांनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी क्रांती केली. कामगारांच्या न्याय हक्कासाठी चळवळ उभी केली. दिड दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊनी साहित्यातही क्रांती केली. त्यांची फकीरा कादंबरी जगभर गाजली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारसरणीच्या प्रचारासाठी त्यांनी आपली लोककला समर्पित केली. त्यामुळेच त्यांच्या हातून “जग बदल घालुनिया घाव, सांगून गेले भिमराव” या अजरामर ओळी लिहिल्या गेल्या. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांनी “यह आजादी झुठी है। देश की जनता भुखी है। हा नारा दिला. आजही देशाची विदारक स्थिती तशीच आहे. देशातील पन्नास टक्के जनता अर्धपोटीच राहाते. अण्णाभाऊ साठे यांचा नारा देशाला तंतोतंत लागू पडत असल्याचे किरतकर यांनी पुढे सांगितले.