
रत्नागिरी : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या खेड तालुक्यातील मुंबके गावातील मालमत्तेच्या मूल्यांकनाला सुरुवात झाली आहे. मूल्यांकन करण्यासाठी साफेमाची टीम तसेच आयकर विभागाची टीम आज मुंबके गावात दाखल झाली. या टीमने दाऊदच्या बंगल्याची, जागेची पाहणी केली. दाऊदच्या एकूण 13 मालमत्तेच मुल्यांकन केलं जाणार आहे. तसेच यासाठी इन्कम टॅक्स विभागाचे अधिकारी देखील मुंबके गावात आज दाखल झाले. दाऊद इब्राहिम आणि त्याच्या नातेवाइंकांच्या नावे असणाऱ्या मालमत्तेची पाहणी केली जाणार असून त्यानंतर आयकर विभागाचे अधिकारी आपला अहवाल साफेमाकडे देतील
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम.. मोस्ट वाॅन्टेड गुन्हेगार.. पण हा दाऊद कोकणातला…रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबके गावातील दाऊद इब्राहिमच्या संपत्तीवर टाच आणण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकलं गेलं. दाऊदच्या मुंबके गावातील 13 मालमत्तेंचा लिलाव होणार आहे. या सर्व मालमत्तेचे मुल्यांकन करण्यासाठी आयकर विभाग आणि साफेमाची टीम मुंबके गावात दाखल झाली. या टीमकडून दाऊदचं घर, त्याच्या आजूबाजूच्या बागा तसेच इतर मालमत्ताची पाहणी करण्यात आली. या सर्व मालमत्ता दाऊदची बहीण हसीना पारकर आणि आई अमिना यांच्या नावे आहेत. खेडमधील मुख्य मालमत्ता या दाऊदची बहिण हसीनाच्या नावे आहेत, तर इतर मालमत्ता दाऊदची आई अमिना बीच्या नावे आहे. दाऊदचे बहीण-भाऊ मुंबईतल्या पाकमोडिया स्ट्रीटवर राहतात. हे सर्व लोक १९८०च्या दशकात खेडच्या बंगल्यात यायचे. मात्र १९९३च्या बॉम्बस्फोटानंतर हा बंगला ओस पडला आहे. सध्या या घराची अवस्था खंदका प्रमाणे आहे. या ठिकाणच्या भिंतीवर काही लिखाण केलं गेलय. गेली अनेक वर्ष पडून असलेल्या या घरा भोवती मोठमोठाली झाडं वाढली आहेत. तीन मजली टोले जंग असलेली हि इमारत कधी कोसळेल अशीच आहे. इमारत ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यासदंर्भात विचार सुरु होते.
दाऊदचा हा बंगला सेल्फी पाॅईट सुद्धा बनत चालला होता. काहीच दिवसांपुर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीच्या एका फ्लॅटचा १.८ कोटी रुपयांना लिलाव झाला होता. त्यानंतर आता दाऊदच्या त्याच्या मुळ गावातील मालमत्तेवर टाच आणली जातेय. त्यासाठी मुल्यांकन करण्याची पहिलं पाऊल उचलंल गेलं आहे. या सगळ्या प्रॉपर्टीचे मूल्यांकन झाल्यावर लिलाव होईल . लिलाव कधी होईल , या प्रॉपर्टी ची किंमत किती होईल या पेक्षा डॉन ची प्रॉपर्टी कोण घेईल या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे