मुंबई : डाव्या विचारांच्या संघटना संघ परिवार आणि अभाविप या विद्यार्थी संघटनेविरोधात कमालीच्या आक्रमक झाल्याचे आज पहायला मिळाले. एसएफआय-डीवायएफआय-जनवादी महिला संघटना व डाव्या पुरोगामी संघटनांनी संघ परिवार व अभाविपचे वर्तन गुंडशाही प्रवृत्तीचे आहे, असा आरोप करत दादर येथे तीव्र आंदोलन केले. काही दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभाविपच्या कार्यकर्त्यांनी एसएफआयच्या कार्यकत्यांना केलेल्या मारहाण आणि भाजपा सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यात आला.
सत्तेच्या उन्मादामुळेच अभाविपने एसएफआय संघटनेच्या विद्यार्थ्यांवर अत्यंत भ्याड हल्ला व मारहाण केली, असा आरोप डाव्या संघटनांनी केला आहे. २०० हून अधिक विद्यार्थी तसेच युवक, महिला या आंदोलनात सहभागी झाले होते. एसएफआयच्या माजी राज्य सचिव व ऑल इंडिया डेमोक्रॅटिक वुमन्स असोसिएशनच्या अखिल भारतीय अध्यक्ष मरियम ढवळे आंदोलनात सहभागी झाल्या. एसएफआय चे माजी अखिल भारतीय उपाध्यक्ष डॉ. अशोक ढवळे देखील उपस्थित होते.
एसएफआय चे मुंबई जिल्हा सचिव यांनी पुण्यात घडलेली परिस्थिती मांडली. भाजप सरकारला अभाविपला पाठीशी घालत आहे, असा रोप त्यांनी केला. मुंबईतील विविध कॉलेज आणि विद्यापीठात येणाऱ्या दिवसात अभाविप च्या गुंडशाही विरोधात आंदोलन केले जाईल, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य डीआयएफआयचे राज्य सचिव प्रीती शेखर यांनी देखील दिल्लीच्या रमजास कॉलेजमध्ये अभाविपने केलेल्या प्रकाराचा निषेध केला. देशभरात डाव्या संघटनांवर होत असलेल्या हल्ल्याचा निषेध करीत येणाऱ्या काळात मुंबई आणि राज्यभर आंदोलन उभारू असे त्या म्हणाल्या.