रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): डाटा एन्ट्री ऑपरेटरच्या मानधनासाठी शिवसेनेने आज ठिय्या आंदोलन केले. रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये स्थापन केलेल्या आपले सरकार या केंद्रातील डाटा एन्ट्री ऑपरेटर याना अनेक महिने मानधन देण्यात आले नसून ग्रामपंचायतला देण्यात येणाऱ्या स्टेशनरीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत शिवसेनेने ठिय्या आंदोलन करताच जिल्हा परिषद प्रशासन जागेवर आले आहे. यासर्व प्रकरणात होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत आम्हीच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे आमदार उदय सामंत यांनी सांगितले.
डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचे मानधन, स्टेशनरी भ्रष्टाचार,सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्याच्या काढलेल्या नोटीसा सह काही विषयाबाबत शिवसेनेने आज जिल्हापरिषदेच्या आवारात डाटा एन्ट्री ऑपरेटरसह आंदोलन छेडले. या आंदोलनात आमदार उदय सामंत, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश म्हाप, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी,बांधकाम सभापती अरुण कदम,महिला आणि बालकल्याण सभापती ऋजुता खांडेकर,गटनेते उदय बने,रत्नागिरी पंचायत समितीच्या सभापती मेघना पाष्टे आणि सर्व जिल्हा परिषदेचे सदस्य,पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते.
जिल्हापरिषदेच्या आवारात आंदोलन केल्यानंतर सर्वजण बांधकाम सभापती यांच्या दालनात गेले.त्याठिकाणी अधिकारी आणि संबंधित कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकाला बोलावण्यात आले.लोकप्रतिनिधी आणि शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे संबंधित कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकाला देता आली नाहीत.त्यामुळे प्रचंड संताप निर्माण झाला.यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ बामणे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास शीद व इतर अधिकारी उपस्थित होते.
डाटा एन्ट्री ऑपरेटर चे मानधन दिले जात नाही तसेच स्टेशनरी ही न दिल्याने ग्रामपंचायतने पैसे भरण्यास नकार दिला.त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने सरपंच यांना अपात्र करण्याची आणि ग्रामसेवकावर कारवाई करण्याची नोटीस बजावली.याबाबत आमदार उदय सामंत यांनी आज जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.कारवाई करणारे तुम्ही कोण आणि डाटा ऑपरेटरना मानधन मिळत नाही,स्टेशनरी दिली जात नाही हे न बघता सरपंच आणि ग्रामसेवकांवर कारवाई कसली करता असा सवाल आमदार उदय सामंत यांनी विचारल्यानंतर हे कारवाईचे पत्र अनवधानाने पाठवले गेले असून ते मागे घेण्याची तयारी जिल्हा परिषदेने दाखवली. तसेच ग्रामपंचायतना स्टेशनरी मिळाली नसल्याने त्याची नोटीस आम्ही संबंधित कंपनीला आम्ही पाठवू असे सांगण्यात आले.डाटा एन्ट्री ऑपरेटर च्या हजेरीच्या सॉफ्टवेअर बाबतही यावेळी चर्चा झाली.