मुंबई : जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये हागणदारीमुक्तीसाठी अतिशय वेगाने कामे सुरु आहेत. राज्यात गेल्या वर्षभरात १९ लाख शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून देशातील मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र सर्वात आधी हागणदारी मुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
दरवाजा बंद माध्यम अभियानाचा शुभारंभ तसेच हागणदारीमुक्त ११ जिल्हे व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या राज्यातील ३३ ग्रामपंचायतींचा गौरव सोहळा येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आज संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्याला केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नरेंद्रसिंह तोमर, ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता विभागाचे सचिव परमेश्वरन अय्यर,राज्याचे पाणीपुरवठा सचिव राजेशकुमार यांच्यासह राज्यातील विविध जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्वच्छ गावांचे सरपंच आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दरवाजा बंद माध्यम अभियानाच्या पोस्टर्सचे प्रकाशन करण्यात आले. तसेच या अभियानाच्या जनजागृतीसाठी अमिताभ बच्चन व अनुष्का शर्मा यांनी अभिनय केलेल्या जाहीरातींचे यावेळी लाँचिंग करण्यात आले. तसेच ग्रामविकास विभागाच्या बचतगट चळवळीची माहिती देणाऱ्या क्यूआर कोडवर आधारीत ‘यशोगाथा’ या पुस्तकाचेही यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले कि, उघड्यावर शौचाला प्रतिबंध म्हणून केंद्र शासनामार्फत दरवाजा बंद माध्यम अभियान सुरु करण्यात येत आहे. महाराष्ट्रात स्वच्छता अभियानासाठी सर्वजण अतिशय मेहनतीने काम करीत असून राज्यात मागील एका वर्षात 19 लाख शौचालये बांधण्यात आली आहेत. राज्यात ३५ टक्क्यांनी स्वच्छता वाढली आहे. १६ हजार गावे हागणदारीमुक्त झाली असून हे प्रमाण देशातील हागणदारीमुक्त गावांच्या १८ टक्के इतके आहे. २५० शहरांपैकी २०० शहरे हागणदारीमुक्त झाली असून ऑक्टोबर पर्यंत राज्यातील सर्व शहरे तर २०१८ मध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्वच्छता अभियानाबाबत जनजागृतीसाठी अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.