मुंबई : शिवडी दारूखाना या विभागात बीपीटी प्रशासनाच्या कारवाईचा निषेध सामाजिक कार्यकर्त्यामार्फत करण्यात आला. तिरूवल्लुवर एज्युकेशन सोसायटी संचालीत डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे सुरू असलेली बालवाडी अवैध ठरवून ती तोडण्याची नोटीस BPT प्रशासनाने सायंकाळी ५ वा.लावली. इंद्रा नगर,दारूखाना झोपडपट्टीत राहणारे सुमारे ६०/७० गरीब मुले-मुली ह्या बालवाडीत गेले २२ वर्षे शिकण्यासाठी येतात. जाती अंत संघर्ष समिती,महाराष्ट्र व भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ (DYFI ) च्या वतीने बीपीटी प्रशासनाच्या या कारवाईचा निषेध करीत तीव्र निदर्शने करण्यात आली. तसेच ही कारवाई ताबडतोब थांबविण्याची आग्रही मागणी देखील करण्यात आली.अश्या प्रकारची कारवाई करून कष्टकरी,श्रमीक वर्ग आणि वंचित समुदायातील मुला-मुलींना शिक्षण घेण्यापासून रोखणे साफ चुकीचे आहे,असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
“बीपीटी विश्वस्तांनी याची दखल घेऊन सदर कारवाई तातडीने थांबवावी.तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच शिक्षण मंत्री व मनपाचे आयुक्त यांनी आवश्यक हस्तक्षेप करावा व मुलांचे शिक्षण सुरू राहील यासाठी पावले उचलावीत. बळजबरीने कारवाई केल्यास जाती अंत संघर्ष समिती व DYFI या कारवाई विरोधात राज्यभर लोकशाही मार्गाने आंदोलन करेल, ” असा इशारा BPT प्रशासनास दिल्यानंतर व पालकांचा रोष पाहील्यानंतर कारवाई तुर्तास थांबविण्यात आली.
शिवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पो.निरिक्षक मनोज सेंद्रे यांनी मध्यस्ती करून एका आठवड्यात वारिष्ठांसोबत चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले गेले. यावेळी पालक व विद्यार्थ्यांनी जय भीम,इन्कीलाब जिंदाबाद ,शिक्षा हमारा अधिकार है अशा घोषणा देत आनंद व्यक्त केला.
शैलैंद्र कांबळे,अशोक पवार,रमेश तडके -जाती अंत संघर्ष समिती महाराष्ट्र प्रविण भास्कर मांजलकर,-DYFI, राजाकुट्टी राजू-जयभिम फाउंडेशन धारावी, कुमरेशन हरिजन,साबळे,शशांक-घर हक्क संघर्ष समिती यांनी निदर्शनाच नेतृत्व केले.
















