रत्नागिरी (आरकेजी): कोकणात गेले दोन दिवस जोरदार अतिवृष्टीमुळे वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील हर्णे-पाचपंढरी,आंजर्ले किनारी पाच नौका बुडाल्या. या बोटीतील २८ पैकी २५ खलशांना वाचविण्यात यश आले असून ३ खलाशी बेपत्ता असल्याचे वृत्त आहे.
गेल्या तीन दिवसांपासून कोकणाला पावसाने झोडपून काढलं आहे. त्यामुळे समुद्रात सुद्धा वादळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हर्णे-पाचपंढरी जवळच्या सुवर्णदुर्ग किल्याजवळ असणाऱ्या अनेक बोटी आश्रयासाठी खाडीकडे निघाल्या होत्या. अनेक बोटी हर्णे आणि आंजर्ले खाडी किनारी निघाल्या होत्या. त्यावेळी पाच बोटी समुद्रात बुडाल्या. बंदरात बोटी सुरक्षित ठिकाणी हलवताना हि दुर्घटना घडली.आशिया, भक्ती, श्रीप्रसाद, साईगणेश आणि गगनगिरी अशी बोटींची नावे आहेत. या बोटीवरील २८ खलाशांपैकी २५ खलाशी सुखरुप किनाऱ्यावर परतले आहेत. तर तीन खलाशी बेपत्ता असून सुलंदर भैय्या, कुलंदर भैय्या आणि कैलास जुवाटकर अशा बेपत्ता खलाशांची नावे आहेत. दरम्यान, स्थानिक नागरिक आणी कोस्टगार्डच्या माध्यमातून तीन बेपत्ता खलाशांचा शोध सुरु आहे.