
रत्नागिरी : वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांविरोधात दापोली वनविभागाने कारवाईचा फास आवळला असून आज (गुरुवार) सकाळच्या सुमारास तालुक्यातील खेर्डी येथील एका घरावर छापा मारला. यावेळी वन्यप्राण्याचे सुमारे २० किलो मांस जप्त करण्यात आले. या प्रकरणी ४ जणांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.
दापोली वन विभागाच्या अधिकार्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार परिक्षेत्र वनाधिकारी सुरेश वरक, वनपाल जांभळे, वनरक्षक पाटील, जळणे, वडर यांनी खेर्डी येथील अजेंद्र सीताराम जाधव यांच्या घरावर आज सकाळी छापा मारण्यात आला. यावेळी वन्यप्राण्याचे 20 किलो मांस सापडले. या प्रकरणी राजेंद्र जाधव यांना ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीवरून आनंद यादव, स्वप्नील कदम, महेंद्र सावंत यानाही ताब्यात घेतले. उर्वरित २ जण अजून सापडलेले नाहीत. १२ बोअर सिंगल बँरलच्या २ बंदुका, २ कोयते व २ सुरे जप्त करण्यात आले आहेत. ताब्यात घेतलेल्या चौघांना उद्या दापोली न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वनाधिकार्यांनी दिली.















