रत्नागिरी, (आरकेजी) : दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात 21 व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रिडा महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते या क्रिडा महोत्सवाचे आज सकाळी उद्घाटन करण्यात आलं.
आजपासून सुरु झालेला हा क्रिडा महोत्सव 1 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. राज्यातील चार कृषी विद्यापीठासह एकूण 20 विद्यापीठांमधील विद्यार्थी स्पर्धक या महोत्सवात सहभागी झाले आहेत. महोत्सवात कब्बड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल आणि ऍथलॅटिक्स या क्रीडा प्रकारांचा समावेश असणार आहे. याकरिता राज्यातून सुमारे 2500 स्पर्धक, 500 संघ व्यवस्थापक, पंच, क्रिडा अधिकारी, विद्यार्थी कल्याण अधिकारी तसेच इतर 500 अधिकारी व कर्मचारी दापोलीत आहेत. आज सकाळी या महोत्सवाचं उद्घाटन मोठ्या दिमाखात पार पडलं, यावेळी सर्वच विद्यापीठाच्या विद्यार्थ्यानी सुत्रबद्ध संचलन केलं. या कार्यक्रमाला स्थानिक आमदार संजय कदम यांच्यासह, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम उपस्थित होते.