रत्नागिरी,(आरकेजी) : कोकणात सध्या तापमानाचा पारा चांगलाच उतरला आहे. त्यामुळे कोकणालाही सध्या हुडहुडी भरली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा तापमानाचा पारा चांगलाच खाली आला आहे. मिनिमहाबळेश्वर म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या दापोलीत तापमानाचा पारा ११ अंश सेल्सिअसपर्यत खाली आला आहे. त्यामुळेच दापोलीकरांना सध्या चांगलीच हुडहुडी जाणवत आहे. दिवाळीनंतर थंडी कोकणातून गायब झाली होती. मात्र ओखी वादळानंतर हरवलेली थंडी पुन्हा आल्याचं चित्र आहे. डिसेंबर महिन्यात तापमानाचा पारा ओखी वादळाच्या आधी २२ अंशावर गेला होता. ७ डिसेंबरपासून पुन्हा एकदा तापमानात घट पहायला मिळत आहे. पुढील काही दिवस कोकणात थंडीचा जोर असाच रहाणार अाहे. त्यामुळे आंबा आणि काजू पिकासाठी पोषक वातावरण असणार आहे. तर नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणाची वाट धरलेल्या पर्यटकांसाठी थंडी खुशखबर घेवून आली आहे.