रत्नागिरी : बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील ३४ कर्मचारी महाबळेश्वर येथे विद्यापीठच्या बसने सहलीला निघाले होते. यामध्ये लिपिक , अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक यांचा समावेश होता. मात्र पोलादपूर पासून १५ किमी अंतरावर आंबेनळी दरीत बस कोसळली. या दुर्घटनेत बसमधील 33 जणांचा मृत्यू झाला असून एक प्रवासी सुदैवाने बचावला आहे. प्रकाश सावंत देसाई असं त्यांचं नाव आहे. प्रकाश सावंत-देसाई हे कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक अधीक्षक आहेत. देसाई यांनीच कोकण कृषी विद्यापीठामध्ये फोन करून अपघाताचं वृत्त दिलं. महिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार अशी सलग सुट्टी आल्याने कर्मचारी महाबळेश्वरला पिकनिकला निघाले होते. यासाठी त्यांनी विद्यापीठाचीच बस भाड्याने घेतली होती. परंतु बस रायगडमधील पोलादपूर घाटात आल्यावर दरीत कोसळली.हा अपघात शनिवारी सकाळी १० च्या सुमारास झाला .सर्व कर्मचारी दापोली चिपळूण तालुक्यात राहणारे आहेत- त्या सर्व भागात शोककळा पसरली आहे.स्थानिक आणि महाबळेश्वरमधील ट्रेकर्सच्या मदतीने हे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात येत आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता. ५०० फूट खोल दरीत कोसळलेल्या या बसचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. तर बसमधील मृतदेह जंगलात अस्तव्यस्त पडले होते. अपघातामुळे छिन्नविछिन्न झालेले मृतदेह पाहून ग्रामस्थ अक्षरश: हादरून गेले आहेत. या अपघाताची माहिती वाऱ्यासारखी पसरताच रत्नागिरीवर शोककळा पसरली. तर दापोलीतील व्यापाऱ्यांनीही बाजारपेठा बंद ठेवल्या. या घटनेनंतर कृषी विद्यापीठात शुकशुकाट पसरला होता. घटनेची माहिती मिळताच प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी वर्गाने घटनास्थळी धाव घेतली. मृतांच्या नातेवाईकांनीही घटनास्थळी धाव घेऊन एकच आक्रोश केला. मृतांच्या कुटुंबीयांनी घाटात रडारड सुरू केल्याने त्यांना आवरणेही कठीण झाले होते. दरम्यान, घाटातील मृतदेह काढण्याचं काम सुरू असून मुसळधार पावसामुळे मदतकार्यात अडथळा निर्माण होत होते.