रत्नागिरी ,(आरकेजी) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी शेतकर्यांविरुद्ध अपशब्द वापरल्यानंतर राज्यभरात भाजपाची प्रतिमा मलीन होत आहे. असे असताना भाजपामधील काही जण दानवे यांची पाठराखण करत आहेत. सरकारमधीलच सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सुद्धा दानवेंच्या वक्तव्याच्या निषेध करण्याऐवजी त्यांची पाठराखण केली आहे.
कांबळे रत्नागिरी दौर्यावर असताना म्हणाले की, रावसाहेब दानवे शेतकऱ्यांना एकही वाक्य बोललेले नाहीत. काय साले रडतात हे वाक्य कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले, असा खुलासा कांबळे यांनी केला आहे. तूर प्रकरणात सरकारने काय केले हे लोकांना सांगण्यासाठी दानवे यांनी ते शब्द कार्यकर्त्यांना वापरले असे कांबळे म्हणाले. वरतून त्यांनी ‘काय साले रडता’ हे वाक्य चक्क दोन वेळा उच्चारले. शुक्रवारी रत्नागिरीतल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.