रत्नागिरी: डोंबिवली नागरी सहकारी बँकेने (डीएनएस) रत्नागिरीतील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला. महिला दिनाचे औचित्य साधून टीआरपीनजीक बँकेच्या कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला.
रत्नागिरी शहर पोलिस निरीक्षक निशा जाधव, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील प्राध्यापिका तथा एनसीसीतील कार्यक्षम अधिकारी डॉ. सीमा कदम, प्रख्यात वकील व सामाजिक कार्यकर्त्या अॅड. प्रिया लोवलेकर, ग्रा. पं. सदस्य साक्षी भोंगले, जागुष्टे हायस्कूलमधील शिक्षिका अर्चना जोशी यांचा सन्मान केला. याप्रसंगी सत्कार टेक पॉइंटच्या सौ. राणे, आंबा बागायतदार मीरा दामले, श्रीमती पेजे, भाई वडापावच्या संचालिका पल्लवी शिंदे, डॉ. पल्लवी गद्रे, शिक्षिका नेत्रा राजेशिर्के, सौ. डोंगरे, संगीता माईण यांचाही सत्कार बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रकाश खाडिलकर यांनी केला. खाडिलकर यांनी प्रास्ताविकामध्ये बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली. सुरवातीला पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली.
या वेळी निशा जाधव म्हणाल्या की, सायबर फ्रॉडचे प्रमाण महिलांच्या बाबतीत जास्त आहे. एटीएम कार्ड बंद आहे, नंबर सांगा, ओटीपी सांगा असे विचारल्यावर महिला बळी पडतात. ऑनलाइन कर्ज देतो, एवढे रुपये भरा असे सांगितल्यावरही महिला फसतात. बँकेतून असे फोन कधीही केले जात नाहीत. त्यामुळे सावध राहा. महिला दिन हा एक दिवस साजरा करायचा नसून 365 दिवस आपलेच आहेत. रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात मला काम करण्याची संधी मिळाली. देशाच्या संरक्षणमंत्रीसुद्धा महिलाच आहेत. आपण महिला कशातही कमी नाही. सावित्रीबाई फुले यांची जयंतीही आपण मोठ्या प्रमाणात साजरी केली पाहिजे.
या वेळी डॉ. सीमा कदम यांनी महिलांच्या अंगचे गुण सांगितले. तसेच चारित्र्य जपणे ही महत्त्वाची गोष्ट असून तसे संस्कार आपण मुलीवर केले पाहिजेत. आज महिला कोठेही कमी नाहीत. तर अॅड. लोवलेकर यांनीही महिला दिनाचे महत्त्व सांगितले. अर्चना जोशी यांनी बँकेने केलेल्या सत्काराबद्दल आभार मानले.