शिर्डी :-पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांनी पुढील पिढ्यांसाठी दूरदृष्टीतून सुरू केलेले दंडकारण्य अभियान मोठी लोकचळवळ ठरली आहे. सध्या असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आणि मागील महिन्यात झालेली ऑक्सिजनची कमतरता या सर्व बाबींमुळे निरोगी जीवन व प्राणवायूसाठी वृक्षारोपण, संवर्धन व पर्यावरण संवर्धन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे केले.
अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज येथे जयहिंद लोकचळवळ, अमृत उद्योग समूहातील सर्व संस्था, सर्व सेवाभावी संस्था, विविध शासकीय विभाग, शाळा व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोळाव्या दंडकारण्य अभियानाच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी मुख्य प्रवर्तक आमदार डॉ.सुधीर तांबे हे होते. तर व्यासपीठावर प्रकल्प प्रमुख सौ दुर्गाताई तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव पा. खेमनर, शिवाजीराव थोरात, सभापती सौ सुनंदाताई जोर्वेकर, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ आदी उपस्थित होते.
यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनी अत्यंत दूरदृष्टीतून पुढील पिढ्यांसाठी दंडकारण्य अभियान सुरु केले. मागील पंधरा वर्षात हे अभियान मोठी लोकचळवळ झाली आहे. या अभियानाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली असून यामध्ये तालुक्यातील नागरिक व सहकारी संस्थांचा मोठा वाटा राहिला आहे. मागील वर्षी व या वर्षी आलेल्या कोरोना संकटांत जीवन काय आहे हे सर्वांना कळले आहे. प्राणवायू व चांगल्या जीवनासाठी पर्यावरण संवर्धन अत्यंत महत्त्वाचे असून मानवाने यापूर्वी केलेल्या दुर्लक्षामुळे ग्लोबल वार्मिंगच्या समस्या, प्रदूषण, वादळे, दुष्काळ असे अनेक नैसर्गिक संकटे माणसावर आली. या सर्वांसाठी आपण सर्वांनी वृक्षसंवर्धन व पर्यावरणाचे संवर्धन केले पाहिजे. यावर्षी एक जुलैपासून दंडकारण्य अभियानाचा प्रारंभ होत असून यामध्ये तालुक्यातील विविध रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षांचे रोपण, गावोगावी मोकळ्या जागेत, डोंगर व गायरानावर विविध वृक्षांचे रोपण करण्यात येणार असून शेतांच्या कडेला ही नारळ, लिंबू, जांभूळ, शेवगा, आंबा, चिंच हे उपयोगी वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे.
चंदनापुरी घाट, क-हे घाट, माहुली घाट या घाटांमध्ये विविध फुलांचे रोपण करण्यात येणार आहे या वर्षीच्या दंडकारण्य अभियानात सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले
आमदार डॉ.तांबे म्हणाले की, दंडकारण्य अभियान ही संगमनेर तालुक्याची वेगळी ओळख आहे. पर्यावरण संवर्धनाच्या या दिशादर्शक कामातून वृक्षसंवर्धन संस्कृती राज्यात वाढली आहे. शासनानेही अनेक योजना राबवल्या आहेत. यामध्ये दंडकारण्य अभियानातून विविध ठिकाणी घनदाट वनराई निर्माण करण्यात येणार आहे. सहकारी संस्थांचा यामध्ये महत्त्वाचा वाटा असून मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या वर्षीच्या दंडकारण्य अभियानात तालुक्यातील आबालवृद्ध युवक, नागरिक सर्व सेवाभावी संस्था व सहकारी संस्थांनी आपले सक्रिय योगदान द्यावे असे ते म्हणाले
दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, एका विषाणूने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मास्क लावणे भाग पडले आहे. भविष्यात ऑक्सिजनमुळे पाठीवर सिलिंडर लागू नये यासाठी वृक्षारोपण संवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे. महिलांनी आपल्या घराच्या परीसरात कढीपत्ता, लिंबू ,आवळा या उपयोगी झाडांच्या रोपण करावे याप्रसंगी अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी अधिकारी व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक बाळासाहेब उंबरकर यांनी केले तर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी आभार मानले.
कोरोनामुक्त गाव अभियानात सहभाग घ्या – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
राज्यातील शहरी भागातील कोरोना आटोक्यात येत असून ग्रामीण भागात कोरोना रुग्णवाढ पूर्णपणे रोखण्यासाठी सर्व गावांतील नागरिकांनी पुढाकार घेत राज्य शासनाने सुरू केलेल्या कोरोनामुक्त गाव अभियानात सहभाग घ्यावा व लवकरात लवकर आपले गाव, तालुका, जिल्हा व राज्य पूर्णपणे कोरोनामुक्त करण्यात आपले योगदान द्यावे असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर केले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावर आयोजित विविध गावांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ सुधीर तांबे, सौ.दुर्गाताई तांबे, प्रांतअधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे उपस्थित होते.
याप्रसंगी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षीही आणि यावर्षीच्या दुसऱ्या लाटेतही अत्यंत प्रभावीपणे काम केले आहे. महाराष्ट्राने केलेल्या कोरोनाबाबतच्या उपाययोजनांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे. माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मी जबाबदार या अभियानांतर्गत गावोगावी नागरिकांची तपासणी झाली. मोठ्या प्रमाणावर तपासणीमुळे रुग्णसंख्या काही काळ वाढलेली दिसली मात्र यातून त्या नागरिकांवर तातडीने उपचार करणे शक्य झाले. यामध्ये नागरिकांचेही मोठे सहकार्य लाभले आहे. कोरोना हा अदृश्य शत्रू आहे. त्याला पूर्णपणे घालविण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. लॉकडाउनच्या शिथिलतेनंतर काहीशी वाढणारी गर्दी अत्यंत चिंताजनक आहे. यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. म्हणून प्रत्येकाने शासकीय नियमांचे पालन करा. नेहमीच मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सींगचे पालन करा व कोणत्याही आजाराची लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्या.
याचबरोबर आपले कुटुंब,आपले गाव पूर्ण कोरोनामुक्त करण्याची जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या कोरोनामुक्त गाव अभियानात प्रत्येक गावांनी सहभाग घ्यावा. यामुळे प्रत्येक गाव कोरोनामुक्त होऊन आपला तालुका कोरोनामुक्त होईल. त्यानंतर जिल्हा, राज्य व आपला देश ही कोरोनामुक्त होईल. या राष्ट्रीय कार्यात सहभाग घेताना या अभियानात प्रत्येकाने सक्रिय पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
आमदार डॉ. तांबे म्हणाले की, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यात व संगमनेर तालुक्यात प्रशासनाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अत्यंत प्रभावीपणे काम केले आहे. हे कोरोनाचे संकट आपल्याला पूर्णपणे घालवायचे आहे. यासाठी नागरिकांनी कायम सतर्कता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. शासनाने सुरू केलेल्या कोरोनामुक्त गाव अभियानामध्ये आपण सक्रीय सहभाग घ्या. संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून यामध्ये १७१ गावांपैकी ८१ गावे कोरोनामुक्त झाली असून ३१ गावे लवकरच कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत. ही आनंदाची बाब आहे मात्र संपूर्ण तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी आपण सर्वांनी योगदान द्यावे असेही ते म्हणाले. यावेळी गावच्या प्रतिनिधींनी गावांतील कोराना उपाययोजनांबाबतची माहिती दिली.