
रत्नागिरी, (आरकेजी) : रत्नगिरी-सिंधुदुर्ग या दोन जिल्हांना जोडणारा सागरी महामार्गावरील दांडी पूल खचल्यामुळे त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. पर्यायी मार्ग म्हणून आता डोंगर-तिठा मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्याना जोडणाऱ्या सागरी महामार्गावर अनेक मोठे पूल उभारण्यात आले आहेत. राजापूर तालुक्यातील अणसुरे गावाजवळील दांडी पुल त्यापैकीच एक आहे. दांडी पुलाचा भाग खचू लागला आहे.
रत्नागिरी बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या पुलाचा खचणारा भाग सावरण्याचा प्रयत्न करण्यात आला. लाखो रुपये खर्च करण्यात आले, मात्र, पुलाचा भाग मात्र खचण्यापासून रोखण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला अपयश आले. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला गेला.