रत्नागिरी, (आरकेजी) : समुद्राला आलेल्या उधाणाचा फटका दापोली तालुक्यातील हर्णै-पाजपंढरी परिसरालाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. किनारपट्टीलगत राहणाऱ्या मच्छीमार बांधवांच्या घरात उधाणाचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली आहेत.
हर्णै पाजपंढरीतील बहूतांशी मच्छीमार बांधव किनारपट्टीलगतच राहतात. महिनाभर पावसाचा जोर कायम आहे. रविवारपासून कोकण किनारपट्टीवर हायअर्लट दिल्यानंतर किनारपट्टीवर जोरदार पाऊस, वादळ वाऱ्यामुळे दाणादाण उडाली आहे. हर्णैपाजपंढरीच्या किनारपट्टीलगतचे मच्छीमार बांधव पूर्णपणे घाबरून गेले आहेत. दोन दिवसांपासून लाटांचे तडाखे किनारपट्टीवर बसत आहेत. हर्णैमध्ये कनकदुर्ग व हर्णै जेट्टीपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या लाटांचा मारा होत आहे. हर्णै बंदरामध्ये देखील पाणी प्रचंड वाढले होते. हर्णैपासून पाजपंढरीकडे जाताना मोठमोठ्या लाटा रस्त्यावर येत असल्यामुळे बहूतांश ठिकाणी कचरा साचून रस्ता खराब झाला होता. निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पाजपंढरीमध्ये पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. किनारपट्टी लगत असलेल्या राममंदिर व गजानन महाराज मंदिरापासून संपूर्ण वस्तीमध्ये पाणी घूसले होते. येथे राहणाऱ्या भगवान कुलाबकर यांच्या घराचे दोन्ही दरवाजे लाटांमुळे तुटले आणि पाणी घरात शिरले. विठा दोरकुळकर,पोशिराम दोरकुळकर, कमलदोरकुळकर, खोपटकर, मधूकर चोगले यांच्या व तेथून पुढे असणाऱ्या सर्व घरांमध्ये लाटांचे पाणी शिरले. लहान मुलांना खांद्यावरच घेऊन रात्र काढावी लागली. किनारपट्टीला सुरक्षित बंधारा नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.