रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि सुखद बातमी समोर आली आहे. पावसाच्या सततच्या हजेरीमुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली असून, नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील एकूण ७२ लहान-मोठ्या धरणांपैकी तब्बल ३८ धरणे पूर्णपणे म्हणजेच शंभर टक्के भरली आहेत. यामध्ये तालुकानिहाय आकडेवारी पाहिल्यास मंडणगडमधील ३, दापोलीतील ४, खेडमधील ५, गुहागरमधील १, चिपळूणमधील ७ आणि संगमेश्वरमधील २ धरणे पूर्ण भरली आहेत. तसेच रत्नागिरीतील १, लांजातील १० आणि राजापूरमधील ५ धरणांचाही शंभर टक्के भरलेल्या धरणांमध्ये समावेश आहे.
केवळ शंभर टक्केच नव्हे, तर इतर धरणांमधील पाणीसाठाही उत्तम स्तरावर पोहोचला आहे. जिल्ह्यात ५ धरणे ही ९० टक्क्यांपेक्षा जास्त भरली असून ६ धरणे ७० टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मिळून एकूण ७८ टक्के इतका भक्कम पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा पाणीसाठा ८१ टक्के होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा अगदी किंचित कमी असला, तरी सध्याची जलसाठ्याची स्थिती अत्यंत समाधानकारक आणि उत्तम असल्याचे चित्र आहे. यामुळे आगामी काळात पिण्याच्या प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे.















