रत्नागिरी : दापोली तालुक्यात शिवसेनेचे माजी आमदार सुर्यकांत दळवी विरुद्ध रामदास कदम आणि अनंत गिते यांच्यातील अंतर्गत वाद ऐन निवडणुकीच्या तोंडावर चव्हाट्यावर आले आहेत. दोघांच्या कार्यपद्धतीवर दळवी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आज दापोली तालुका शिवसेना कार्यकारणीने राजीनामे देत दळवी यांना समर्थन दिले आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत पक्षातील काही जणांनी गद्दारी केल्यामुळे माझा पराभव झाला होता. आज त्याच बंडखोरांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये उमेदवारी मिळाली आहे, असा आरोप दळवी यांनी केला आहे. त्यामुळे नाराज झालेल्या दळवी यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. दापोली, खेड, मंडणगड या तीन तालुक्यात दळवी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर दळवी यांची नाराजी थोपविण्यात पक्षाला यश आले नाही तर त्याचा फटका शिवसेनेला बसू शकतो. दरम्यान येत्या दोन दिवसात आपण आपली भुमिका जाहिर करू, अशी भुमिका दळवी यांनी जाहीर केली आहे. आता ते काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.