मुंबई, (निसार अली) : उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे दलितांवर करण्यात आलेले हल्ले आणि बुलढाणा येथे चर्मकार समाजातील महिलेवर झालेल्या अत्याचारविरोधात आज ग्रँटरोड रेल्वे स्थानकाच्या बाहेर विविध पक्ष आणि संघटनांनी निदर्शने केली. तसेच माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने राजभवनावर जाऊन राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेतली. दलितांवर अत्याचार करणार्यांवर कारवाई करावी असे निवेदन त्यांना देण्यात आले.
सहारनपूरमध्ये लित अत्याचाराच्या घटना घडत आहेत. योगी आदित्यनाथ यांचे सरकार आपल्या पाठीशी आहे अशा भावनेतून तथाकथीत उच्चवर्णीय दलित, मुस्लिमांवर अमानुष अत्याचार करत आहेत. बुलढाणा येथे तर एका चर्मकार समाजातील महिलेची विवस्त्र धिंड काढण्यात आली.
देशातील वाढत्या असहिष्णूतेच्या वातावरणामुळे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे विविध संघटनानी एकत्र येऊन निदर्शने केली. डॉ.मुणगेकर यांच्यासोबत गेलेल्या शिष्टमंडळात निवृत्त पोलीस महासंचालक सुधाकर सुराडकर, राष्ट्र सेवा दलाचे मुंबई अध्यक्ष शरद कदम, संविधान संवर्धन समितीच्या मुमताज शेख, ललित बाबर, उल्का महाजन, शैलेंद्र कांबळे, आशिष मेस्त्री, अच्युत भोईटे, विजय कुलकर्णी आदींचा समावेश होता.
निदर्शनात संविधान संवर्धन समिती, राष्ट्र सेवा दल, समता अभियान, जातीअंत संघर्ष समिती,राष्ट्रीय दलित मानवाधिकार अभियान, सर्वहारा आंदोलन, सदभावना संघ, कचरा वाहतूक श्रमिक संघ, जनता दल, लाल निशाण पक्ष, सत्यशोधक ओबीसी संघटना, युवा क्रांती सभा, डी. वाय. एफ .आय., महाराष्ट्र युवा परिषद, नॅशनल ख्रिश्चन फोरम, प्रहार संघटना, मौलाना आझाद विचार मंच, इंडियन सोशल मोव्हमेंट, महाराष्ट्र मातंग एकता दल, धी बुद्धिष्ट शेड्युल कास्ट मिशन ऑफ इंडिया, गुंज एक आवाज, सिटीझन फॉर जस्टीस अँड पीस,एस. एफ. आय.चिराग प्रतिष्ठान, एनसीपीडी आदी संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
बँक कर्मचाऱ्यांचे नेते विश्वास उटगी, जनता दलाचे प्रभाकर नारकर, प्रफुल्लता दळवी, मधू मोहिते, विशाल हिवाळे, सुबोध मोरे, सुरेश सावंत, मिलिंद रानडे, युवराज मोहिते, उषाताई अंभोरे, वर्षा विद्या विलास महादेव पाटील, राम कोंडाळकर, हिरामण खंडागळे, वैशाली जगताप, सीताराम शेलार आदी यावेळी उपस्थित होते.