मुंबई : सर्व विभागांच्या समन्वयातून आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सव शांततापूर्ण वातावरणात पार पाडावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांची आढावा बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार आशिष शेलार, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक उपस्थित होते.
दहीहंडीच्या कालावधीत कुठल्याही प्रकारची दुर्घटना होणार नाही याची खबरदारी राज्य सरकारतर्फे घेण्यात येईल. त्याचवेळी या आयोजनाच्या दृष्टीने कायदेशीर मार्ग पडताळून पाहण्यात येतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
पोलीस विभागाने गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या कालावधीत शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम चोखपणे करावे. गणेशोत्सव तसेच दहीहंडी मंडळांनी याकामी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव विजय सतबीर सिंग, पोलीस महासंचालक सतीश माथूर, मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, गृह विभागाचे (विशेष) प्रधान सचिव रजनीश सेठ, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव एन. जे. जामदार, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, गणेशोत्सव समितीचे सदस्य, दहीहंडी उत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते.