डोंबिवली, (प्रशांत जोश) : शहर आणि ग्रामीण भागात श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या भावभक्तीत साजरा झाला. त्यानंतर ठिकठिकाणी खासगी 263 तर 52 ठिकाणी सार्वजनिक अशा एकूण 315 दहीहंड्या विविध गोविंदा पथकांनी फोडल्या. बाजीप्रभू चौकातील डोंबिवलीचा मानबिंदू, शिवमंदिर चौकात प्रदूषण मुक्तीचा संदेश देणारी शहर प्रमुख राजेश मोरे यांची, चार रस्ता येथे बच्चे कंपनीच्या आवडीची ‘कृष्ण बनून या बक्षिस घेऊन जा’ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची, पश्चिमेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहून आणि सलामी देऊन सुरुवात झालेली नगरसेविका मनिषा शैलेश धात्रक आयोजित भाजपची तर सुभाष रोड येथे काँग्रेसची अशा दहीहंडी उत्सवाने दिवसभर डोंबिवली तसेच ग्रामीण परिसरात ढाक्कुमाकुमच्या तालावर गोविंदानी दहीहंड्या फोडून न्यायालयाच्या आदेशांचे पालन करीत गोविंदा पथकांनी दहीहंडी उत्सव मोठा धुमधडाक्यात साजरा केला.
विशेष म्हणजे पूर्वेकडील बाजीप्रभू चौकातील भाजपा पुरस्कृत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आयोजित बचत विषयावर आधारित दहीहंडी शहरात चर्चेचा विषय ठरली. एक किलोमीटर क्षेत्रात हंडी फोडणाऱ्या गोविंदासाठी चव्हाण यांनी इन्शुरन्स काढला होता. ह.भ.प. एकनाथ भोईर, साईबाबा गणेश मंदिर चरिटेबल ट्रस्ट खंबालपाडा, वै.ह.भ.प. बाळाराम कृष्णा पाटील प्रतिष्ठान आजादेगांव, जे.पी. ग्रुप मंडळ, आजदेपाडा, दीनदयाळ रोड पश्चिम येथील भाजपा नगरसेवक शैलेश धात्रक आणि नगरसेविका मनीषा धात्रक यांची दहीहंडी उत्सव, पूर्वेकडील शंकर मंदिर चौक येथील शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांचा दहीहंडी उत्सव, आयरे रोड येथील श्री. साई दहीकाला उत्सव मंडळ यांचा दहीहंडी उत्सव, कोपरगांव येथील माजी नगरसेवक संजय पावशे यांचे शिवमंदिर मित्रमंडळ, लक्ष्मण कृष्णा पावशे सामाजिक संस्था दहीहंडी उत्सव आणि मनसे तर्फे चार रस्ता येथे हंडी लावण्यात आली होती. बाळकृष्ण बनून या आणि बक्षीस घेऊन जा असे आवाहन मनसेच्या मध्यवर्ती शाखेने केले होते त्याला बाळगोपाळाचा चांगला प्रतिसाद मिळाला. दहीहंडी उत्सवाला मुंबईतील घाटकोपर, भांडूप, मुलुंड, ठाणे, दिवा, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ येथून गोविंदा पथकांनी डोंबिवली पूर्व-पश्चिम तसेच ग्रामीण विभागात हजेरी लावली होती. यामध्ये अखिल खिंडीपाडा गोविदा पथक, खंबाळपाडा गोविंदा, अष्टविनायक मित्र मंडळ पुरुष आणि महीला गोविंदा पथक आदींनी पाच थर लावून दहीहंडीला सलामी दिली. आयोजकांनी सलामी दिलेल्या प्रत्येक गोविंदा पथकांना रोख बक्षिसे व आकर्षक चषक यशस्वी मंडळांना देण्यात आले. आपल्या उज्वल भविष्यासाठी अधिकाधिक सायकलचा वापर करुन प्रदूषण टाळा व पर्यावरण वाचवा हा संदेश देण्यासाठी नागरिकांसाठी लकी ड्रॉ द्वारे अनेक बक्षिसांबरोबर देण्यात आलेल्या सायकलींचे बक्षिस हे वेगळे आकर्षण ठरले.
अष्टविनायक महिला पथकाच्या प्रमुख माजी नगरसेविका सरोज भोईर म्हणाल्या, आमचे पथक दिवसभर अनेक दहीहंड्यांना सलामी देते. आज महिला कुठल्याही क्षेत्रात मागे राहिलेली नाही. भारतीय जनता पार्टी आणि ओम गणपती मित्र मंडळ यांच्यावतीने डोंबिवली पश्चिमेकडील एव्हरेस्ट परिसरात भव्य दहीहंडी महोत्सवात महिलासाठी लावलेली 22 हजार 222 रुपयांची दहीहंडी अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव महिला गोविंदा पथकाने फोडली. यावेळी नगरसेवक शैलेश धात्रक आणि नगरसेविका मनीषा धात्रक उपस्थित होते.