रत्नागिरी (आरकेजी) : इयत्ता १२ वी नंतर १० वीच्या निकालातही कोकण विभागीय शिक्षण मंडळाने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. आज राज्यभरात दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला. ९ विभागात कोकण मंडळ ९६.१८ टक्के मिळवून राज्यात पहिले आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळवून कोकणची मुले हुशारच यावर शिक्कामोर्तब केले आहे.
तनुजा मोरे(पावस हायस्कूल), अथर्व भिडे (फाटक हायस्कूल), दुर्वेश दिनेश बोडकर (कै. सौ. मिनाताई ठाकरे हायस्कूल, साडवली देवरुख), मुग्धा पोखरणकर(पटवर्धन हायस्कूल), हेमांगी दांडेकर (पटवर्धन हायस्कूल), मुक्ताई देसाई( जानशी हायस्कूल राजापूर), साईका तिरजावे (सरस्वती हायस्कूल, पाचल), निविदिता परांजपे(दापोली), ईशा शिवलकर (दापोली) आदी विद्यार्थ्यांचा १०० टक्के गुण मिळविणाऱ्यांमध्ये समावेश आहे.
मार्च २०१७ मध्ये कोकण बोर्डातून एकूण ३९ हजार ६१७ विद्यार्थी परिक्षेला बसले. यापैकी ३८ हजार १०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोकण मंडळांतर्गत रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९५.५४ टक्के तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ९७.५५ टक्के लागला.
यावेळच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.०८ टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.०५ टक्के इतके आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९७ टक्के तर ९८. १४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. कोकण विभागीय मंडळाच्या प्रमुख विषयांपैकी समाजशास्त्र या विषयाचा निकाल सर्वाधिक ९८.६७ टक्के एवढा लागला आहे.