रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): दागिने पॉलिश करायच्या बहाण्याने रत्नागिरीतील एका विवाहितेचे दोन तोळ्यांचे दागिने भामट्यानी लांबवले. याप्रकरणी दोघांविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सुप्रिया दिपक चव्हाण (३९,रा. खेडेकरवाडी शिरगाव,रत्नागिरी) यांनी याबाबत शहर पोलिसांकडे तक्रार दिली. गुरुवारी दुपारच्या सुमारास सुप्रिया चव्हाण घरी असताना दोघेजण त्यांच्या घरी आले. त्यांनी आम्ही दागिने पॉलिश करणारे असून, तुमचे दागिने पॉलिश करायचे आहेत का? अशी विचारणा केली. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून, सुप्रिया चव्हाण यांनी हातातील तांब्याची अंगठी त्यांच्याकडे दिली. ती अंगठी त्यांनी पॉलिश करुन दिल्यावर त्यांनी आपले मंगळसूत्र आणि कानातले पॉलिश करण्यासाठी त्या दोघांकडे दिले. त्यांनी ते सोन्याचे दागिने एका डब्यात टाकून त्यात तूरटी आणि हळद टाकली. त्यानंतर चव्हाणांना गरम पाणी आणण्यास सांगितले. त्या घरातून पाणी आणण्यासाठी गेल्याची संधी साधत, त्या दोन्ही भामट्यांनी आपल्याकडील खोटे दागिने डब्यात टाकून त्यातील सोन्याचे दागिने आपल्या बॅगेत टाकले. दरम्यान, सुप्रिया चव्हाण गरम पाणी घेउन बाहेर आल्यावर त्यांनी ते पाणी डब्यात टाकून दहा मिनिटांनी दागिने धुऊन घेण्यास सांगितले व दुचाकीवरुन पळ काढला. काही वेळाने चव्हाणांनी डब्यातील दागिने बाहेर काढले असता, त्यांना ते आपले सोन्याचे दागिने नसल्याचे लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. याप्रकरणी दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.