
चिपळूण तालुक्यातील निरबाडे गावातील घटना
रत्नागिरी, 24 June : दगड खाणीतील डबक्यात दोन सख्ख्या बहिणी बुडाल्याची घटना चिपळूण तालुक्यातील निरबाडे येथे आज (बुधवार) दुपारी घडली. या दोघीही आपल्या आईबरोबर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. या दुर्घटनेत 9 वर्षांच्या नजराना अहमद शेख या बालिकेचा बडून दुर्दैवी मृत्यू झाला. तर दुसरीला वाचविण्यात यश आलं असून तिच्यावर चिपळूणमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चिपळूण तालुक्यातील निरबाडे मोहल्ला येथे राहणाऱ्या नजराना (9) आणि अरजीना अहमद शेख ( 11 ) या दोघी आपल्या आईबरोबर दुपारी दगडाच्या खणीमधील डबक्यात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी नजराना हिचा पाय घसरून ती पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी अरजीना पुढे सरसावली. मात्र दोघीही बुडू लागल्या. यावेळी त्यांच्या आईने आरडाओरडा केला. त्यावेळी आवाज ऐकून जवळ असलेल्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्यात उतरून दोघींनाही बाहेर काढलं. त्यानंतर दोघींनाही चिपळूणमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच नजराना हिचा मृत्यू झाला. तर अरजीनावर उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली होती.