मुंबईमध्ये अधिकाधिक ठिकाणी ‘चार्जिंग स्टेशन्स’ सुरु करण्याचे निर्देश
पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनचे लोकार्पण
“पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहने (E.V.) ही काळाची गरज असून, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध सार्वजनिक वाहनतळांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंगची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. या अनुषंगाने इलेक्ट्रिक वाहनांची संख्या अधिक असलेल्या परिसरांमध्ये इ. व्ही. चार्जिंग स्टेशन सुरु करण्याचा प्राधान्यक्रम निश्चित करणे गरजेचे आहे. या दृष्टीने अभ्यासपूर्ण सर्वेक्षण करुन अधिकाधिक सार्वजनिक वाहनतळांच्या ठिकाणी चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध करुन द्यावी”, असे निर्देश राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. ते आज दादर (पश्चिम) परिसरातील मनपा सार्वजनिक वाहनतळामध्ये उभारण्यात आलेल्या इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे लोकार्पण करतेवेळी उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होते. विशेष म्हणजे आज लोकार्पित करण्यात आलेले चार्जिंग स्टेशन हे सार्वजनिक वाहनतळांमध्ये कार्यान्वित करण्यात आलेले राज्यातील पहिले ‘इ. व्ही. चार्जिंग स्टेशन’ आहे.
दादर (पश्चिम) परिसरातील प्लाझा चित्रपट गृहानजीक व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी उत्तर विभाग कार्यालयाजवळ असणा-या मनपा सार्वजनिक वाहनतळातील (कोहिनूर) दुस-या मजल्यावर इ. व्ही. चार्जिंग स्टेशनची सुविधा आजपासून कार्यान्वित करण्यात आली आहे. या लोकार्पण कार्यक्रमास आमदार श्री. सदा सरवणकर, आमदार श्रीमती मनिषा कायंदे, स्थानिक नगरसेविका श्रीमती प्रिती पाटणकर, माजी महापौर व नगरसेविका श्रीमती श्रद्धा जाधव, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त श्री. किरण दिघावकर यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर नागरिक उपस्थित होते. आज लोकार्पित करण्यात आलेल्या चार्जिंग स्टेशनच्या ठिकाणी पार्किग व चार्जिग ही सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेमुळे परिसरातील नागरिकांना आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण सुविधा उपलब्ध होण्यासह इलेक्ट्रिक वाहनांद्वारे प्रवास करुन मुंबई शहरात येणा-या नागरिकांना देखील एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध झाली आहे.
पार्किंग व चार्जिंग एकाच ठिकाणी उपलब्ध असणा-या या चार्जिंग स्टेशनमध्ये एकावेळी ७ इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यापैकी ४ ‘चार्जर’ हे जलद चार्जर असून, या प्रत्येक चार्जरद्वारे साधारणपणे एका तासात एक वाहन, याप्रमाणे एका तासात एकावेळी ४ वाहने ‘चार्ज’ करता येऊ शकतात. तर, या व्यतिरिक्त ३ चार्जर हे संथ चार्जर (स्लो चार्जर) या प्रकारातील असून, याद्वारे १ वाहन चार्ज करण्यास साधारणपणे ६ तासांचा कालावधी लागतो. या ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्यासाठी प्रती युनिट रुपये १५/- इतके शुल्क आकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे चार्जिंग स्टेशन आठवड्याचे सातही दिवस २४ तास (24 x 7) नागरिकांच्या सुविधेसाठी कार्यरत राहणार आहे, अशी माहिती या निमित्ताने सहायक आयुक्त श्री. किरण दिघावकर यांनी दिली आहे.
१. E.V. हे इलेक्ट्रिक वाहनाचे संक्षिप्त रूप आहे. E.V. ही अशी वाहने आहेत, की जी एकतर अंशतः किंवा पूर्णपणे विद्युत शक्तीवर चालतात. इलेक्ट्रिक वाहनांचा इंधन खर्च कमी असतो. कारण त्यांची हालचाल करणारे भाग कमी असतात आणि कमी किंवा नगण्य जीवाश्म इंधन (पेट्रोल किंवा डिझेल) वापरतात. त्यामुळे पर्यावरणास ते अनुकूल असतात.
२. चार्जिंग स्टेशन, ज्याला EV चार्जर देखील म्हणतात हा प्लग-इन इलेक्ट्रिक वाहने (संकरित, इलेक्ट्रिक वाहने, ट्रकसह, बसेस आणि इतर) चार्ज करण्यासाठी विद्युत पुरवठा करणा-या उपकरणांचा एक भाग आहे.
३. ईव्ही चार्जरचे २ प्रकार पुढीलप्रमाणे आहेत:
अ) डीसी चार्जर (जलद चार्जर, औद्योगिक श्रेणी, १-१.५ तासांमध्ये इलेक्ट्रिक वाहन पूर्णपणे चार्ज करते)
ब) एसी चार्जर (संथ चार्जर, घरगुती/घरगुती श्रेणी, इलेक्ट्रिक वाहन पूर्णपणे ६-७ तासांमध्ये चार्ज करते)
४. दादर (पश्चिम) परिसरातील सार्वजनिक वाहनतळामध्ये (कोहिनूर) २ डीसी जलद चार्जर बसवले आहेत, जे एकावेळी ४ वाहने वेगाने चार्ज करतील आणि ३ संथ चार्जर देखील असून जे एकावेळी ३ वाहने चार्ज करतील.
५. दादर (पश्चिम) परिसरातील सार्वजनिक वाहनतळामध्ये (कोहिनूर) आता दररोज (२४ तासांमध्ये) साधारणपणे ७२ इलेक्ट्रिक वाहने चार्ज होऊ शकतात.
६. हे सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहन (२ चाकी, ३ चाकी, ४ चाकी वाहने इ.) आणि सर्व प्रकारच्या ब्रँड (टाटा, एमजी हेक्टर, ह्युंदाई इ.) यांना चार्ज करण्यास सक्षम आहे.
७. इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्यासाठीची किंमत १५ रुपये प्रती युनिट आहे.
८. इलेक्ट्रिक वाहनाला पूर्ण चार्ज होण्यासाठी २० युनिट्स – ३० युनिट्स लागतात ज्याची किंमत २०० ते ४०० रुपयांपर्यत येईल आणि अंदाजे चलन क्षमता (ड्रायव्हिंग रेंज) १४०-१७० किमी इतकी आहे.
९. चार्जिंग सुविधा २४ x ७ उपलब्ध आहे.
१०. सार्वजनिक वाहनतळ आरक्षणासाठी नागरिकांना ऑनलाइन ऍपद्वारे आरक्षण सुविधा देखील उपलब्ध असून ‘ओटोपार्क मोबाईल ऍप्लिकेशन’ द्वारे कोहिनूर सार्वजनिक वाहनतळ वर ऑनलाईन पार्किंग बुक आणि आरक्षित करता येईल.
११. ऑनलाईन बुकिंग ऍप हे चालकांना वाहनतळामध्ये पार्किंगची ताशी किंवा मासिक आधारावर आरक्षण करण्यास मदत करेल. तसेच वाहनतळावर आल्यावर पार्किंगची खात्रीशीर जागा मिळवून देईल. यामुळे पार्किगसाठी जागा शोधण्यातला वेळ वाचणार असून, परिणामी इंधन खर्चात देखील बचत होणार आहे.
१२. ओटोपार्क SINE हे ऍप आय.आय.टी., मुंबई यांच्या सहकार्याने विकसीत करण्यात आले असून, यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने आणि NIDHI EiR या योजनेअंतर्गत भारत सरकारने निधी दिला आहे.
१३. हे ऍप नागरिक ‘प्ले स्टोअर’ वरून डाउनलोड करू शकतात आणि वाहनतळामध्ये जागा आरक्षित करण्यासाठी वापरू शकतात तसेच ओटोपार्क ऍपद्वारे मुंबईतील इतर वाहनतळ मध्ये आरक्षण करणे शक्य आहे.
१४. हे ऍप मुंबईकरांना ‘नो पार्किग’ क्षेत्रात आल्यावर सूचना पाठवून दंड आकारण्यापासून मदत करते आणि त्यांना जवळच्या उपलब्ध पार्किंगसाठी मार्गदर्शन करते. तसेच हे ऍप जास्तीत-जास्त सुरक्षेसाठी यात आधार पडताळणी तंत्रज्ञान समाविष्ट आहे.
१५. या वाहनतळामध्ये वाहन धुलाई केंद्र (कार वॉशिंग सेंटर) सुविधा देखील उपलब्ध आहे.
१६. या वाहनतळामध्ये विदयुत कारला चार्ज करण्यासाठी किंवा कार धुवायची वाट पाहत असताना, ड्रायव्हर्स लाऊंज मध्ये प्रवासी आराम करू शकतात. या ठिकाणी चहा-नाश्त्याची सुविधा सशुल्क पद्धतीने उपलब्ध आहे.















