मुंबई : दादर स्थानकाचे नामांतर करा, अशी मागणी करत भीम आर्मीने रेल्वे स्थानकावर डाॅ बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस म्हणा असे संदेश लिहिलेले फलक ठिकठिकाणी लावले होते. मध्य आणि पश्चिम या दोन्ही मार्गावर हे फलक लावण्यात आल्याने ते सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.
दादर पूर्वेला डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह हे ऐतिहासिक निवासस्थान व आंबेडकरी चळवळीचे केंद्र असलेले डाॅ बाबासाहेब आंबेडकर भवन आहे तर पश्चिमेला दादर चौपाटी येथे चैत्यभूमी आहे. आंबेडकरी चळवळीसाठी महत्वाच्या असलेल्या या स्थानकाला दादर हे नाव संयुक्तिक वाटत नाही कारण दादर या नावाला काही अर्थबोध होत नाही. केंद्र सरकारने व्हीक्टोरिया टर्मिनस ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे नाव दिले. त्याच प्रमाणे डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने व पावन झालेल्या दादरला त्यांचे नाव द्यावे या मागणीकडे केंद्र सरकार व रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रातिनिधिक स्वरुपात नामांतराचे फलक लावून भीम आर्मीने आंदोलन केले, अशी माहिती आर्मीचे भारत एकता मिशनचे महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे व मुंबई प्रमुख अॅड रत्नाकर डावरे यांनी सांगितले.