
रत्नागिरी, (आरकेजी) : मुंबई-दाभोळ प्रवासी फेरीबोटीला तब्बल 45 वर्षानंतर पुन्हा सुरूवात झाली आहे. मुंबई ते दाभोळ या मार्गावर दिघी बंदर मार्गे ही बोट दाभोळला बुधवारी दाखल झाली. मुंबई – दाभोळ अशी जाणारी रावे नावाची ही बोट 35 प्रवासी घेऊन आली. महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी व पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी मेरिटाइम बोर्डाने प्रवासी सेवा सुरू केली आहे.
मेरिटाइम बोर्डाने हे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. यामुळे पर्यटकांची गैरसोय दूर होऊन पर्यटनाला मोठी उभारी मिळणार आहे. 35 प्रवासी क्षमतेच्या या बोटीचे तिकीट 650 रूपये इतके आहे. मुंबई ते दाभोळ प्रवासाला तब्बल 12 तासांचा कालावधी लागत आहे. मात्र बोटीच्या पहिल्याच प्रवासाला खुप विलंब झाला. बुधवारी सकाळी ही बोट भाऊचा धक्का येथून सुटली आणि सायंकाळी साडेपाच वाजता बोटीने दिघी बंदर गाठले मात्र दिघी येथे पाण्याची पुरेशी पातळी नसल्या कारणाने बोट समुद्रातच थांबवण्यात आली. छोट्या बोटीने प्रवाशांना या ठिकाणी आणण्यात आले व त्यानंतर दाभोळचा प्रवास सुरू झाला दाभोळ येथे ही बोट रात्री 11.45 वाजता येणे अपेक्षित होतं मात्र रात्री पावणेदोन वाजता ही बोट दाभोळच्या धक्क्यावर पोहचली. बोट जर अशीच उशिरा दाभोळला पोहोचली तर कदाचित प्रवाशांच्या पुढच्या प्रवासाचा गोंधळ होवू शकतो. त्यामुळे बोट मुंबईतून सकाळी लवकर सोडावी अशी मागणी होत आहे. दुस-या दिवशी हीच बोट 10 प्रवासी घेवून मुंबईला रवाना झाली. मात्र ही बोट दाभोळ बरोबरच जयगड बंदर, गणपतीपुळे, रत्नागिरी, देवगड, मालवण आणि तिथून गोव्यापर्यंत धावली पाहीजे अशी मागणी होतेय. या प्रवासाला वेळ देखील कमी लागला पाहिजे. या बोटीची मागणी रत्नागिरीचे अॅड. विलास पाटणे आणि माजी आमदार चंद्रकांत मोकल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती.














