रत्नागिरी : कोकण ही निसर्गसंपन्न भूमी आहे. कोकणात समुद्रकिनारे, किल्ले तसेच अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. म्हणूनच कोकणातील पर्यटन वृध्दीसाठी सरकारमार्फत अनेक योजना राबविल्या जातात; त्याचाच एक भाग म्हणून म्हाडा कला व क्रीडा महोत्सवा घेण्यात आला आहे, असे जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी सांगितले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली येथे महाराष्ट्र गृह निर्माण व क्षेत्र् विकास प्राधिकरण कोकण गृहनिर्माण व क्षेत्र् विकास मंडळ यांच्या म्हाडा कला व क्रीडा महोत्सव तरंग २०१७ च्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ मुंबईचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे, महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरणाचे सचिव बी. एन. बास्टेवाड, कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी विजय लहाने, दापोलीच्या नगराध्यक्षा उल्का जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
पर्यटनाच्या माध्यमातून कोकणातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असल्याचे वायकर म्हणाले. या क्रीडा स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूना त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील करिअरसाठी सरकारकडून आवश्यक मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. दापोली येथील नवानगर झोपडपट्टीसाठी म्हाडाच्या माध्यमातून कमी दरामध्ये सर्वसुखसोयीनी समृध्द असलेली घरे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी म्हाडा व प्राधिकरण विभागाचे अधिकारी, कर्मचारी व खेळाडू मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.