मुंबई : कष्ट करून घेतलेले शिक्षण एक वेगळे समाधान आपल्याला देऊन जाते. अशा प्रकारच्या शिक्षण घेणे अनेकांना प्रेरणा देऊन जाते. हीच प्रेरणा विक्रोळीत सिलिंडरची ओझी वाहणार्या नाना शेंबडे या विद्यार्थ्यामुळे अनेकांना मिळणार आहे. कष्टकरी असलेल्या नानाने शिक्षणात पडलेल्या खंडावर यश मिळवत वयाच्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात बारावी उत्तीर्ण होत ५२ टक्के गुण मिळविले आहेत.
भरलेल्या सिलिंडरची ओझी दिवसभर पाठीवर वाहून नानाने यश मिळविले आहे. सकाळी सिलिंडर वाहणे आणि रात्र महाविद्यालयात शिक्षण असे शिवधनुष्य नानाने शिक्षणासाठी पेलले. परिस्थितीमूळे नानावर सिलेंडरची ओझी वाहण्याची वेळ आली.
नाना मूळचा सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दहीवाडी या गावाचा रहिवासी आहे. अर्धवट शिक्षण त्याने सोडले आणि तो मुंबईत आला. बहिणीकडे राहू लागला. उदरनिर्वाहासाठी त्याने एका गॅसच्या कंपनीत सिलिंडर उचलण्याची नोकरी पत्करली. त्यावेळी त्याने दहावीचे शिक्षणदेखील पुर्ण केले नव्हते. दारोदार सिलेंडर पोहचवताना इतर शिक्षीत व्यक्तिंना पाहून नानालाही आपणही शिकावे असे वाटायचे. त्याने विक्रोळीतील शारदा या रात्रशाळेत दहावीसाठी प्रवेश घेतला. तेथे शिक्षणाला प्रोत्साहन देणारे शिक्षक मिळाले आणि पहिल्याच प्रयत्नात नाना दहावी उत्तीर्ण झाला. याआधी दहावी उत्तीर्ण होण्याअगोदर त्याच्या शिक्षणात तब्बल तीन वर्षांचा अंतर पडले होते. तरिही त्याने दहावी परिक्षेचे आव्हान लिलया पेलले. यानंतर त्याने याच शारदा रात्र कनिष्ठ महाविद्यालयात बारावीही पूर्ण केली.
“सुरुवातीच्या वेळी सिलिंडर घेऊन फिरताना मला लाज वाटायची. सोबत शिकणारे मित्र मला पाहायचे, त्यावेळी असली नोकरी नको वाटायची. परंतु, सिलिंडर दारोदार पोहचवताना शिकलेली माणसे दिसली की त्यांच्यासारखच अापणही चांगल करिअर करायचे, हाच ध्यास बाळगून होतो,” असे नाना म्हणाला.
नाना त्याच्या आपल्या यशाचे श्रेय भावोजी संतोष मानवर आणि त्याचे सहकारी मारुती शेळके आणि मुख्याध्यापक जयवंत पाटील व शिक्षक संजय सोनटक्के यांना देतो.
दिवसभर सिलिंडरची ओझी वाहून जिने वर खाली करून अंगात ताकद उरायची नाही. पण शिकायचेच हाच उद्देश मनात होता, वेळ मिळेल तसा अभ्यास केला, असेही तो म्हणाला.
नानाना आता हॉटेल मॅनेजनेंट करायचे आहे. त्यासाठी पैसे आणायचे कुठून असाही प्रश्न त्याच्यासमोर आहे. त्यामुळे आता त्याच्यासमोर नवे आव्हान असणार आहे.