रत्नागिरी (आरकेजी): मंडणगड तालुक्यातील वेसवी गावात झालेल्या सिलेंडरच्या स्फोटात अख्ख घर जळून खाक झाले. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. यात घरातील चार जण भाजून गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचार्थ मुंबईला हलवण्यात आले आहे.
मन्सुर अहमद हुसैन लांबे यांच्या घरी किचनमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत मन्सुर अहमद हुसैन लांबे यांचे घर आगीच्या भक्षस्थानी पडले. यामध्ये जावेद मुल्ला, दिलदार लांबे, रईस मरणे, मझहर बेंडुर हे चौघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मसीना ह़ॉस्पीटल मुंबई येथे अधिक उपचार सुरु आहेत. तर मन्सूर लांबे व खलिल लांबे यांच्यावर महाड येथील रुग्णालयात अधिक उपचार सुरु आहेत. किरकोळ जखमी झालेले मोहीब लांबे यांच्यावर उपचार करुन त्यांना घरी पाठवण्यात आले. या भीषण आगीत घर जळून पुर्णतः खाक झाले. घरातील अन्नधान्य, कपडा लत्ता, भांडीकुंडी, सोन्या चांदीचे दागदागीने जळाले आहेत. तर सव्वा पाच लाखांची रोकड, पाच फ्रीज, इनव्हरटर, वॉशींग मशीन, टि.व्ही. सोफा, लाकडी फर्निचर, जळून नष्ठ झालं आहे. सुमारे 50 लाखांचे नुकसान झाल्याची माहीती तलाठी पाटील यांनी अपघातानंतर आज (बुधवार ता.20 जून) रोजी केलेल्या पंचनाम्यात नमुद केली आहे.