New Delhi : तौते चक्रीवादळ येत्या चोवीस तासात अधिक तीव्र होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. सध्या हे चक्रिवादळ मुंबईच्या दक्षिणेस 450 किलोमीटरवर असून पुढे गुजरातच्या दक्षिण-दक्षिणपूर्व दिशेला 840 किमी अंतरावर आहे. ते येत्या चोवीस तासात गुजरातकडे सरकरण्याची शक्यताही हवामान खात्यानं व्यक्त केली आहे.
कोकण किनारपट्टी आणि गोव्यात 16 मे रोजी काही भागात तसेच घाटमाथ्यावर मूसळधार ते अतिमूसळधार तर उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी 17 मे रोजी मूसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागात 16 मे रोजी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील तर 17 मे पासून 18 मेच्या सकाळपर्यंत किनारपट्टीच्या उत्तर भागात वाऱ्याचा वेग ताशी 65 ते 75 किमी असू शकतो. तो वाढत तो ताशी 85 किलोमीटर इतका वाढू शकतो असा इशाराही देण्यात आला आहे.
महाराष्ट्राची किनारपट्टी, खासकरुन किनारपट्टीच्या उत्तरेकडच्या भागातला समुद्र येत्या चोवीस तासात खवळलेला असेल. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये आणि जे मच्छिमार समुद्रात असतील त्यांनी तातडीनं किनाऱ्यावर यावं अशी सूचना देण्यात आली आहे.