
डोंबिवली (प्रशांत जोशी) : पर्यावरण व वाहतूक समस्या लक्षात घेता या समस्येला सोपा उपाय आहे सायकल. वाहतूकीचे साधन, व्यायामाचे साधन म्हणूनही सायकलिंगला महत्व लाभले आहे. हे उदिदष्ट लक्षात घेऊन ‘सायकल मित्र संमेलन ‘संकल्पना पुढे आली. डोंबिवली येथे पहिले संमेलन संपन्न झाल्यानंतर आता ठाण्यात येत्या 3 फेब्रुवारी रोजी एक दिवसाचे सायकल मित्र संमेलन डॉ. काशिनाथ घाणेकर नाटयगृहात आयोजित करण्यात आले आहे.
डोंबिवली सायकल क्लब, नॅशनल युथ ऑर्गनायझेशन व क्रिडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले संमेलन संपन्न झाले होते. तेथील प्रतिसाद पाहून ठाण्यात दुसरे सायकल मित्र समेलन 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यत आयोजित केले असून डोंबिवली सायकल क्लब, क्रिडा भारती, क्रिडा मंत्रालय, पोलीस कमिशनर ठाणे व ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संमेलनाचे अध्यक्ष दिपक मेजारी यांनी दिली.
यानिमित्त शालेय निबंध स्पर्धा, चित्रीकरण स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा, व्हिझुअल आर्ट स्पर्धा चित्रकला, व्यंगचित्रकला, कोलाज, रांगोळी अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. संमेलनाच्या दिवशी सकाळी ७ वाजता शिवाजी मैदान जांभळी नाका ते काशिनाथ घाणेकर सभागृह अशी 10 कि.मी. लांबीची सायकल फेरी आयोजित केली आहे.















