मुंबई : क्रिस्टल टॉवरला आग लागल्यानंतर पालिकेने संपूर्ण इमारत रिकामी केली. यावेळी विकासकाने ५८ रहिवाशांना अंधारात ठेवून घरे विकल्याचे समोर आले. यामुळे बेघर झालेल्या रहिवाशांना निवाऱ्यासाठी वणवण फरत आहेत.
‘क्रिस्टल’ला आग लागल्यानंतर ही संपूर्ण १६ मजली इमारत रिकामी केली आहे. टॉवरमध्ये एकूण ४८ कुटुंबे राहत होती. मात्र, आग लागल्यानंतर अचानक पालिकेने घरे रिकामी केली. ऐन पावसाळ्यातच घरे रिकामी केल्याने राहायला जागा कुठे मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. यातच संसाराचे संपूर्ण सामना दुसऱ्या ठिकाणी नेण्याची कसरत करावी लागत आहे. रहिवासी आज सकाळपासून आपल्या संसाराचे सामान घेऊन नव्या जागेच्या शोधात निघाले आहेत. चौदाव्या मजल्यावर आमचा फ्लॅट आहे. मात्र आता घर रिकामे करावे लागणार असल्यामुळे सांताक्रूझ येथे नातेवाईकांकडे तात्पुरते राहण्यास जात आहे. या ठिकाणची सर्व व्यवस्था कधीपर्यंत होईल याबाबत कुणीच काही सांगत नाही. त्यामुळे सगळं पुन्हा ठीक होईपर्यंत राहण्यासाठी शोधाशोधच करावी लागणार असल्याचे अनिरुद्ध जैन या रहिवाशांनी सांगितले. तर २००५ मध्ये पुनर्विकास सुरू झाल्यानंतर २०१५ मध्ये रहिवासी या ठिकाणी राहायला आले. यावेळी बिल्डरने राहिवास्यांना इमारतीला ‘ओसी’ असल्याचे सांगत इतर अनिवार्य बाबींची पूर्तता केली असल्याचे सांगितले. त्यामुळेच आपण या ठिकाणी राहायला आल्याचे रहिवासी ऍड. गुणरत्न सदावर्दे यांनी सांगितले. बिल्डरच्या या फसवणुकीच्या विरोधात सिनियर पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्याकडे कारवाईसाठी हरकतीचा अर्ज केल्याचे सांगितले. इमारतीला आग लागल्यानंतर संपूर्ण इमारतीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मात्र याठिकाणी अद्याप पालिका किंवा बिल्डरकडून कोणत्याही प्रकारची स्वच्छता करण्यात आलेली नाही. त्यामुळे या संपूर्ण इमारतीची स्वच्छता प्रतिकुटुंब १० हजार रुपये काढून करण्याचा निर्णय रहिवाशांच्या बैठकीत घेण्यात आल्याचे रहिवासी अनिल काळे यांनी सांगितले. स्वतःच्या मेहनतीने घेतलेले हे घर आहे. शिवाय दुसरे घर घेण्याची आपली आता ऐपतही नाही. त्यामुळे दुसरीकडे जागा शोधण्याचा प्रश्नच नाही. काही झाले तरी इथेच राहणार, असा निर्धार येथील राजिंदार कपूर या रहिवाशांनी केला आहे.