मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रीत सहभागातून मुंबईत आकाश, पाताळ, जल आणि स्थळ अशा सर्वच ठिकाणी पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे होत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने मुंबईच्या पूर्व समुद्री किनाऱ्याचा मोठा कायापालट होत आहे. पूर्वी फक्त खास लोकांसाठी खुला असलेला मुंबई पोर्ट ट्रस्टचा भाग आता सामान्य लोकांसाठी खुला होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल, कोस्टल रोड, सी प्लेन, रोरो सेवा, प्लोटींग रेस्टॉरन्ट अशा विविध प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्राकडे देश – विदेशातील पर्यटक आकर्षित होण्याबरोबरच राज्याच्या जीडीपी वाढीमध्ये मोठे योगदान मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे नवीन आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलचे आज मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय जहाज आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, आमदार राज पुरोहीत, आशिष शेलार, मुंबई पोर्ट ट्रस्ट अध्यक्ष संजय भाटिया आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पोर्टच्या माध्यमातून देशाच्या विकासाला गती देण्याचे स्वप्न बघितले होते. सागरमाला अभियानाच्या माध्यमातून ते साकार होत आहे. मुंबईतील रोरो टर्मिनल चे काम २५ मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येईल. साधारण एप्रिलपासून ही सेवा सुरू करण्यात येईल. मांडवा, नेरुळ येथे रोरो सेवेच्या माध्यमातून वाहने गेल्यास वेळ आणि इंधनाची बचत होण्याबरोबरच रस्त्यांवरील गर्दी कमी होऊ शकेल. जेएनपीटी येथे सेझच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक येत आहे. महाराष्ट्राच्या जीडीपी वाढीसाठी याचा फार मोठा लाभ होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. तर मेट्रोच्या कामातून निघणाऱ्या मातीचा उपयोग करून सागरी भराव तयार करून उद्यान तयार करण्याची सूचना नितीन गडकरी यांनी केली आहे. मुंबईच्या विकास आराखड्यास मान्यता देताना या प्रकल्पाला निश्चित मान्यता देऊ. वेस्टपासून वेल्थ तयार करण्याचा हा अभिनव उपक्रम ठरेल. या प्रकल्पासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टला प्लॅनिंग ॲथोरीटीचे अधिकार देऊ, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
क्रुझ पर्यटनाला मुंबईत मोठी चालना – नितीन गडकरी
मुंबईत क्रुझ पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. सागरमाला प्रकल्पांतर्गत महाराष्ट्राला मोठा लाभ मिळत आहे. या प्रकल्पांतर्गत २.४१ लाख कोटींच्या ८६ प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. जेएनपीटी मधील सेझ प्रकल्पात मोठी गुंतवणूक येत असून तिथे येत्या काळात दीड लाख नवीन रोजगार निर्माण होतील. यातील ८० ते ९० टक्के रोजगार हे स्थानिकांना देण्यात येतील, असे नितीन गडकरी म्हणाले. क्रुझ पर्यटनाला मुंबईत मोठा वाव आहे. सध्या मुंबईत दरवर्षी फक्त ८० क्रुझ येतात. त्यातून फक्त २ लाख पर्यटक येतात. भविष्यात ही संख्या वार्षिक साधारण ९५० क्रुझेस आणि ४० लाख पर्यटकांपर्यंत वाढविण्याचे आमचे ध्येय आहे. त्यासाठीच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रुझ टर्मिनलचे काम आम्ही हाती घेतले आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करुन महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या विकासात महत्वाचे योगदान दिले जाईल, असे श्री. गडकरी म्हणाले. मिठी नदीची स्वच्छता आणि मुंबईतील समुद्रात जाणारे सांडपाणी रोखण्याच्या दृष्टीने केंद्र शासनामार्फत मदत करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुंबईला क्रुझ पर्यटनाचे होम पोर्ट बनवू – जयकुमार रावल
जगातील चांगले आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईत आहे. त्याच धर्तीवर आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल येथे उभे केले जाईल. भविष्यात राज्याच्या आर्थिक विकासात पर्यटन क्षेत्र महत्वाची भूमिका निभावणार आहे. त्यादृष्टीनेच केंद्र आणि राज्य शासनाच्या एकत्रित सहभागातून पर्यटनविषयक विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. महाराष्ट्राला मोठा सागरी किनारा, वन्यजीव, जंगले, गड किल्ले, लेण्या, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इमारती असा पर्यटनाचा मोठा वारसा आहे. राज्याचा हा मोठा वारसा जागतिक पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मुंबईला क्रुझ पर्यटनाचे होम पोर्ट बनविण्यात येईल, असे राज्याचे पर्यटन मंत्री रावल यांनी सांगितले. यावेळी कोचीन शीप यार्ड आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्यामध्ये जहाज दुरुस्तीबाबत सामंजस्य करार करण्यात आला.
क्रुझ टर्मिनलची वैशिष्ट्ये
नवीन आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल अंदाजित किंमत सुमारे ३०० करोड रुपये इतकी असून त्याचे क्षेत्रफळ हे साधारण ४.१५ लाख वर्गफूट इतके असेल. वर्षातील सर्व दिवशी ते कार्यान्वित असेल. जून २०१९ पर्यंत याचे काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. देशातील ८० टक्के क्रुझ प्रवाशांची या टर्मिनलमधून ने-आण करण्यात येईल. तळमजला अधिक तीन मजले असे या टर्मिनलचे स्वरुप असेल. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या टर्मिनलमुळे मुंबईतील आयकॉनिक इमारतींमध्ये अजून एका भव्य इमारतीची भर पडणार आहे.