नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी तसेच जलसंपदा, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी यांची पर्यटन क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत गेल्या आठवड्यात मुंबईत बैठक झाली, त्यावेळी देशात क्रुझ पर्यटनाला चालना देण्यासाठी एक कृती आराखडा बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के जे अल्फोन्स देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पर्यटन क्षेत्रातील कंपन्याच्या प्रतिनिधींशी विस्तृत चर्चा केली. या चर्चेतून कृती आराखड्याचा मसुदा तयार करण्यात आला. यानुसार, मुंबईतील काही निवडक ठिकाणांचा पर्यटन केंद्र म्हणून विकास करण्याविषयी प्रामुख्याने चर्चा झाली. त्याशिवाय, स्वच्छता आणि कार्यक्षमता वाढवण्यावर भर देण्यात आला.
मुंबई हे देशात क्रुझ पर्यटनाचे केंद्र असल्यामुळे, ससून डॉक आणि शिवडी किल्ला तसेच मुंबईजवळचे कान्होजी आंग्रे बेट, मांडवा, अलिबाग आणि विजयदुर्ग या स्थळांना आकर्षक पर्यटन केंद म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. डीसीटी च्या मदतीने मुंबई बंदर भागात आणि इतर ठिकाणी उत्तम दर्जाचे रेस्तोरेंट बनवले जातील. त्याशिवाय, राज्याचा पर्यटन विभाग या क्रुझवर सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करेल.
देशातील पर्यटन केंद्रांचा प्रसार आणि जाहिरात करण्यावरही या कृती आराखड्यात भर देण्यात आला आहे. परदेशी पर्यटकाना आकर्षित करण्यासाठी, सरकार आणि खाजगी उद्योग मिळून पर्यटनस्थळांची माहिती देणारे उपक्रम राबवतील. त्याशिवाय, चित्रपटसृष्टीलाही या स्थळांवर चित्रीकरण करण्याची परवानगी दिली जाईल. पर्यटन कंपन्या मुंबईतल्या चौपाट्या आणि मुंबई-गोवा क्रुझ पर्यटनाचा प्रचार करतील.परदेशी नागरिकांसाठी मुंबई हे एक विवाहस्थळ म्हणूनही विकसित केले जाईल. मुंबईतील विविध पर्यटन स्थळे आणि सुविधांची माहिती देण्यासाठी जागोजागी पर्यटक माहिती केंद्र स्थापन केले जातील. त्याशिवाय पर्यटन वाढवण्यासाठीच्या विविध उपाययोजनाची यावेळी चर्चा करण्यात आली.