मुंबई, 22 जून : ओपेक देशांनी केलेल्या तीव्र उत्पादन कपातीमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत मागील आठवड्यात सुमारे १० टक्क्यांची वाढ झाली. आयईएने तेलाची मागणी दररोज ९१.७ मिलियन बॅरल होण्याचे भाकीत केल्यानंतर तेलाच्या किंमतींना आणखी पाठींबा मिळाला असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे मुख्य विश्लेषक प्रथमेश माल्या यांनी सांगितले. मे २०२० च्या मधील प्रोजेक्शनपेक्षा ते जास्त आहे. एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालानुसार, अमेरिकेच्या क्रूड यादी पातळीत १.२ दशलक्ष बॅरलने वाढ झाली. यामुळेदेखील कच्च्या तेलाच्या किंमतीच्या वाढीला मर्यादा आल्या. यातून जगातील कमकुवत मागणीकडे लक्ष वेधले गेले.
मागील आठवड्यात स्पॉट गोल्डच्या किंमती ०.८ टक्क्यांनी वाढल्या. कारण अमेरिका आणि चीनच्या काही भागात कोरोना व्हायरसच्या केसेसमध्ये निरंतर वाढ सुरू आहे. जागतिक अर्थव्यवस्थेभोवतीच्या तणावामुळे बाजाराच्या भावनांवर परिणाम झाला असून सोन्याच्या किंमतीत वाढ झाली. तर चांदीचे दर ०.९२ टक्क्यांनी वधारले आणि ते १७.६ डॉलर प्रति औसांवर बंद झाले. एमसीएक्सच्या किंमती १.९८ टक्क्यांनी कमी होऊन ४८,६३६ रुपये प्रति किलोवर स्थिरावल्या.
जगभरातील देशांनी प्रोत्साहनपर योजनांची घोषणा केल्याने एलएमई कॉपरचे दरही १.१ टक्क्यांनी वाढले. तरीही पेरू येथील खाणीतील कामकाज पुढील आठवड्यात ८० टक्क्यांपर्यंत सुरु होईल, असे वृत्त आल्यानंतर तांब्याच्या किंमतींना मर्यादा आल्या. कारण यामुळे मागणीचा अभाव असताना पुरवठा वाढेल आणि परिणामी दर कमी होतील.