मुंबई : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पवईत पालिकेच्या मलनिस्सारण वाहिनीचे काम सुरु असताना क्रेनचा भाग अंगावर कोसळून तीन कामगार जागीच ठार तर दोन जण जखमी झाले. जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आयआयटी मेन गेटजवळ सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान ही घटना घडली.
महापालिकेच्या मलनिसारण वाहिनीचे काम सुरु होते. हे काम खासगी कंत्राटदाराला देण्यात आले होते. 25 फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता. खड्ड्यातील माती काढण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू होते. माती काढण्याचे काम सुरु असताना काही कामगार खड्ड्यात उतरले. याचवेळी माती काढणा-या हायड्रो क्रेनचा माती उचलणारा भाग (बकेट) कामगारांच्या अंगावर कोसळला. यात रामेश्वर सिंग, सत्यनारान सिंग, विश्वनाथ सिंग या तीन कामगारांचा मृत्यू झाला. पोरत सिंग, रामनाथ सिंग हे कामगार जखमी झाले आहेत. संबंधित कंत्राटदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
———————
ही खूप गंभीर घटना आहे. 3 व्यक्तीचा जीव गेला आहे. घटनेची चौकशी केली जाईल. किरीट सोमय्या, खासदार
——————-
2 वर्षां पासून काम धीम्या गतीने सुरू आहे. महानगरपालिका आणि ठेकेदारांची चौकशी झाली पाहिजे. कामगारांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. क्रेन वायर कशी तुटली ही खूप गंभीर घटना आहे. संबंधितावर हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.
– श्रीनिवास त्रिपाठी , नगरसेवक
——————
अंदाजे 2 वर्षापासून काम चालू आहे. सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नव्हती. आम्ही मुत्यूमुखी पडलेल्या कामगारांना मलनिस्सारण वाहिनीतून बाहेर काढले.
बलवीर सिंह, स्थानिक नागरिक