
म्हसळा : खेकडा आणि खवय्ये यांचे नाते पूर्वापार आहे. खेकड्याची विशिष्ट चव आणि आरोग्याच्या दृष्टीने खेकडे
महत्वाचे असल्याने मार्केट, हॉटेल्स येथे खेकड्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. नेमकं हेच सुनित सावंत यांनी ओळखले आणि स्वतःच्या गावात खेकडा शेती प्रकल्प सुरू केला. खेकड्यांच्या मऊ कवच करण्याचे उत्पादन सावंत घेऊ लागले आणि त्यांच्या खेकड्यांना मोठया प्रमाणावर मागणी येऊ लागली. जाणून घेऊया सुनित सावंत यांची यशोगाथा…

रायगड जिल्हा, म्हसळा तालुक्यातील वारळ हे सावंत यांचे गाव. हे गाव खाडीकिनारी वसलेलं आहे. इतर मुलांप्रमाणे सावंत हेही मुंबईत नशीब आजमावयाला आले. पंरतु, गावी जाऊन काहीतरी करावे असेच त्यांना वाटे. त्यामुळे मुंबईत न रमता लवकरच ते गावी आले. गावी असलेल्या स्वतःच्या जमिनीवर काही तरी सुरू करावे, असे त्यांना वाटे. त्यांना सुरुवातीला कोळंबी शेतीविषयी माहिती मिळाली. जे पण पैसे होते ते त्यांनी त्यासाठी खर्च केले आणि स्वतःच्या जमिनीवर कोळंबी प्रकल्प उभारला. पण हा प्रकल्प खर्चीक असल्याने परवडला नाही. मग त्यांना खेकडा शेती विषयी माहिती मिळाली. याच दोन एकर जागेत त्यांनी शेती करायला सुरुवात केली.
खेकडा शेती हा कोळंबीला पर्याय ठरू शकतो. हे वेळीच लक्षात आले. भारताच्या सागर किनारी आढळणाऱ्या शेकडो जातींपैंकी सावंत यांच्याकडे लाल डेंगा जातीचे खेकडे आहेत. मांसाचे प्रमाण आणि चविष्ठपणा अधिक असते.
सुरुवातीला सावंत यांनी छोटे छोटे खेकडे आदिवासी बांधवांकडून घेतले. ते शास्त्रोक्त पद्धतीने वाढविले. पुर्ण वाढ झाल्यावर खेकडा कडक कवच सोडतो. मग डीप फ्रीजर मध्ये त्याचे संवर्धन केले जाते आणि मुबलक प्रमाणात विक्रीयोग्य माल तयार झाल्यानंतर मुंबई पुण्याला तसेच महाराष्ट्रातील मोठ मोठ्या हॉटेलात त्याची डिलिव्हरी केली जाते. खेकड्याच्या पूर्ण भागाचा खाण्यासाठी वापर करुन लोकांना कॅल्शियम युक्त खाद्य पुरविणे हा ही या व्यवसायामागील उद्देश असल्याचे सावंत सांगतात.
लाल डेंग्या जातिचा खेकडा त्याचे कडक कवच टाकून, मऊ कवच घेतले जाते. त्यामुळे तो नरम व मऊ असतो. त्याला Soft Shell crab असेही म्हणतात. नरम असल्याने फ्राय करुन कवचासह खाता येते. तो मुख्यतः CRAB BURGER, CRAB PAKODA (भजी) करून खाता येतो. त्यामुळे खाणार्यांना भरपूर प्रमाणावर प्रोटीन-कॅल्शियम मिळते. 60g ते 200g पर्यंत हा खेकडा असतो.
आदिवासी आणि मासेमारी करणारे कोळी बांधवांकडून घेऊन त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने संगोपन करुन काथ टाकून नरम झाल्यावर योग्य प्रक्रिया करून डिप फ्रिजर मध्ये त्यांची साठवणूक केली जाते. हि संपुर्ण प्रक्रिया नैसर्गिक पद्धतीने होते.त्यात अनैसर्गिक पद्धतीचा वापर केला जात नाही. थायलंड,मलेशीयामध्ये मोठ्या प्रमाणावर अशी शेती केली जाते. खेकड्याचे कवच मऊ झाल्यावर बाजारपेठेत विक्रीसाठी काढले जाते. तेच मऊ कवचाच्या खेकड्यांना लोदी चिंबोरी कींवा मेंगी चिंबोरी असे कोकणात ग्राम भाषेत म्हटले जाते. ते पुर्वपार कोकणातील खाडीत मिळतात
खेकड्यांच्या उत्पादनात पाण्याची गुणवत्ता सावंत पाहतात. तसेच खेकड्यांना अन्नाची आवश्यकता असते. त्यासाठी वेळेचे नियोजन करून उत्कृष्ट अन्न दिले जाते. त्यामुळे निरोगी आणि चांगले वाढण्यास मदत होते, असे सावंत म्हणाले.
दिवसाला मागणीनुसार खेकडे शेतीतून काढले जातात. त्यांचे वजन तपासले जाते. व्यवस्थित पॅकींग केले जाते. आणि हॉटेल्समध्ये नेले जाते. अशा प्रकारच्या खेकड्यांना मार्केट, हॉटेल्स आणि देश-विदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचे सावंत सांगतात.
खेकड्यांचे उत्पादन घेऊन व्यवसाय करता येऊ शकतो, हे सावंत यांनी दाखवून दिले आहे.















