
डहाणू : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी त्यांच्या डहाणू विधानसभा मतदार संघात आरोग्य सोयी आणि सुविधा सुधारण्यासाठी आमदार निधीतून ₹ 10 लाख ही रक्कम देत असल्याचे जाहीर केले आहे.
संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. सदर घटना ही अतिशय चिंताजनक बाब आहे. देशभरात तसेच राज्यात संचार बंदी, कलम 144 अन्वये लागू करण्यात आली आहे. हे पाहता डहाणू मतदार संघात आरोग्य सुविधांत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी जलद सुधारणा होऊ शकेल, म्हणून ही रक्कम आवश्यक असल्याचे निकोले यांनी सांगितले.
भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आणि इतर डाव्या पक्षांच्या पश्चिम बंगाल मधील सर्व आमदारांनी प्रत्येकी ₹ 10 लाख ही रक्कम आपल्या मतदार संघातल्या आरोग्य व्यवस्थेसाठी दिली आहे. याच धर्तीवर 128 डहाणू विधानसभा (अ.ज.) मतदार संघात आरोग्य सोयी आणि सुविधा सुधारण्यासाठी माझ्या आमदार निधीतून ₹ 10 लाख ही रक्कम देत आहे. जेणेकरून माझ्या मतदार संघात आरोग्य सुविधांत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी जलद सुधारणा होऊ शकेल, असे निकोले यांनी म्हटले आहे.
डहाणू विधानसभा मतदार संघात आरोग्य सोयी आणि सुविधा सुधारण्यासाठी माझ्या आमदार निधीतून ₹ 10 लाख स्वीकार करावेत, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते आदेश द्यावेत ही विनंती. ही रक्कम कोठे व कशासाठी खर्च करायची याबाबत मी आपणाशी लवकरच चर्चा करेन, असे विनती पत्र निकोले यांनी पालघर जिल्हाधिकार्यांना दिले आहे














