मुंबई : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष लढवीत असलेल्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर झाली. उमेदवारांची दुसरी यादी येत्या दोन दिवसांत जाहीर केली जाईल, असे पक्षाकडून सांगण्यात आले.
१. सोलापूर मध्य – कॉ. नरसय्या आडम
२. कळवण (अ.ज.) – कॉ. आ. जे. पी. गावीत
३. नाशिक पश्चिम – कॉ. डॉ. डी. एल. कराड
४. डहाणू (अ.ज.) – कॉ. विनोद निकोले
या निवडणुकीत माकपची तीन उद्दिष्टे आहेत:
● भाजप-शिवसेना युतीचा पराभव करणे.
● माकप व इतर डाव्या पक्षांची ताकद वाढविणे.
● राज्यात धर्मनिरपेक्ष सरकारची स्थापना करणे.
गेल्या पाच वर्षांत भाजप-प्रणित केंद्र व राज्य सरकारने आपल्या जनविरोधी, कॉर्पोरेटधार्जिण्या, धर्मांध आणि हुकूमशाही धोरणांनी महाराष्ट्रातील जनसामान्यांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे, असा आरोप माकपकडून करण्यात आला.
सध्याचे अभूतपूर्व आर्थिक संकट, गेल्या पाच दशकातील परिसीमा गाठलेली बेरोजगारी, आपल्या राज्यात देशातील सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या, संपूर्ण कर्जमाफी आणि उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याच्या आश्वासनाला फासलेला हरताळ, दक्षिण महाराष्ट्रातील व मुंबई-पुण्यातील महापूर आणि मराठवाडा-विदर्भातील दुष्काळ हाताळण्यात सिद्ध झालेली राज्य सरकारची दिवाळखोरी, कामगारवर्गावर सर्व प्रकारे केलेले हल्ले, मनरेगावरील खर्च कमी करून शेतमजुरांवर आणलेली संक्रात, आदिवासींच्या वनाधिकारावर आणलेली गदा व त्या भागातील कुपोषणामुळे वाढत असलेले बालमृत्यू, महिला, दलित व अल्पसंख्याकांवर वाढते हल्ले, सरकारी संस्थांचा सूडबुद्धीने गैरवापर करून लक्ष्य केलेले अथवा वश करून घेतलेले विरोधी पक्षांचे अनेक नेते, डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या कटाच्या सूत्रधारांना पकडण्यात आलेले अपयश, भीमा कोरेगावची दंगल पेटवणाऱ्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना मोकाट सोडून निरपराध लोकांना तुरुंगात डांबण्याचे षडयंत्र, जनतेची उपजीविका, लोकशाही, धर्मनिरपेक्षता व भारतीय संविधान या सर्वांवर केलेले आघात आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अभिप्रेत असलेला महाराष्ट्राचा समान, समतोल आणि सर्वांगीण विकास असे प्रमुख मुद्दे या निवडणूक प्रचारात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष राज्यभर प्रभावीपणे मांडणार आहे.