
मुंबई : पालघर घटनेचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तीव्र निषेध केला आहे. या हत्याकांडाबाबत जाणूनबुजून माकपची बदनामी केली जात आहे. भाजपचे संबित पात्रा व सुनील देवधर यांनी या प्रकरणी कोणतेही कारण नसताना माकपची बदनामी करणारी निवेदने केली आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे माकपचे माजी आमदार आणि केंद्रीय कमिटी सदस्य कॉ. नरसय्या आडम यांनी सांगितले.
जेथे हत्याकांड घडले ती गडचिंचले ग्रामपंचायत गेली १० वर्षे भाजपच्या ताब्यात आहे. गडचिंचले हा भाजपचा गड आहे. सध्याचा सरपंच भाजपच्याच आहेत, असे आडम यांनी निदर्शनास आणून दिले.
सदरच्या पार्श्वभूमीवर हत्याकांडातील मुख्य सूत्रधार कोणाशी संबंधित आहेत ? परिसरात गेले अनेक दिवस अफवा कोण पसरवित होते ? यासारख्या अनेक बाबी आता पोलीस चौकशीत समोर येतीलच, असे त्यांनी म्हटले आहे. परिस्थिती आपल्यावर उलटत असल्याचे पाहून काही मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीही संबंध नसताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची बदनामी करण्याचे निषेधार्ह प्रयत्न सुरू केले आहेत.भाजपचे संबित पात्रा व सुनील देवधर यांनी या प्रकरणी कोणतेही कारण नसताना माकपची बदनामी करणारी निवेदने केली आहेत.काही व्हाट्सअप्प ग्रुप्सवर व फेसबुकवर काही व्यक्तींची नावे मुख्य आरोपी म्हणून टाकून ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे धादांत खोटे लिहून पोस्ट फिरविली जाते आहे, याकडे आडम यांनी लक्ष वेधले.
प्रकाश गाडे यांनी ही पोस्ट लिहिली असल्याचे पोस्टवरून समजते. I Devendra या फेसबुक पेज वरूनही दिशाभूल करणारी, अफवा पसरविणारी पोस्ट फिरविली जात आहे.या घटनेच्या एफ.आय.आर. मध्ये जी पाच नावे आहेत, त्यापैकी कोणीही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सभासद नाही.संबित पात्रा, सुनील देवधर, प्रकाश गाडे, I Devendra फेसबुक पेजचे अडमीन आणि विविध व्हाट्सअप्प ग्रुप्सवर तथा फेसबुकवर अशा पोस्ट फॉरवर्ड करणारे सर्व भाजप समर्थक यांची यादी बनविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने घेतली आहे. पक्ष या सर्वांवर बदनामीची व अफवा पसरविल्याची केस दाखल करत आहे. पालघर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी पक्ष करत आहे.घटनेचा धार्मिक तेढ वाढविण्यासाठी वापर करू पाहणार्यांवरही कडक कारवाई करण्याची मागणी पक्ष करत आहे, असे आडम यांनी म्हटले आहे.















