मुंबई : केंद्रात आणि राज्यात सरकार सत्तेवर येण्यापूर्वी भाजपने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे दिलेले आश्वासन भाजप विसरला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे अशी आग्रही मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. शेतकरी संपात माकपप्रणित अखिल भारतीय किसान सभा सहभागी झाली आहे. तेव्हा दोन दिवसात सरकारने शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा निर्णय घ्याव, अन्यथा सोमवारी ५ जून रोजी महाराष्ट्रातील सर्व तहसीलदार कार्यालयांना टाळे ठोकू, असा इशारा पक्षाचे जेष्ठ नेते खासदार सीताराम येचुरी यांनी दिला.
येचूरी शुक्रवारी मुंबईत आले होते. त्यांनी माकपच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यानंतर मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपा सरकारवर तीव्र टिका केली.
दरवर्षी १२ हजार शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतात. भाजपाच्या तीन वर्षाच्या कार्यकाळात कर्जामुळे ३६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतीत दीडपट उत्पन्न देऊ, असे आश्वासन भाजपाने दिले होते. तेही पूर्ण केलेले नाही. विदेशातून स्वस्त असलेला गहू आणला जात आहे, त्यामुळे या देशातील गव्हाला भाव कसा मिळेल ? असा प्रश्नच त्यांनी मोदी सरकारला विचारला.
अन्नदाता असलेला शेतकरीच जर आत्महत्या करत असेल, तर मग देशाची काय स्थिती असेल, असेही येचूरी म्हणाले. भाजपाचे सरकार शेतकर्यांना कर्जमाफी देऊ शकत नाही. मग उद्योगपतींची ११ लाख कोटीची कर्जही कशी माफ होतात, याकडे येचूरी यांनी लक्ष वेधले. भाजपा सरकार सामान्यांसाठी नाही तर उद्योगपतींसाठी काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
भाजपाचे सरकार जेव्हापासून सत्तेत आले, तेव्हापासून धार्मिक तेढ वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. यांत्रिकी उत्पादन कमी झाले आहे. कृषी उत्पादन तर २ टक्क्यांवर आले आहे.बेरोजगारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नोटबंदीचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे, असेही येचुरी म्हणाले.
समृद्धी मार्ग, मुंबई-दिल्ली ट्रेन, बुलेट ट्रेन यामुळे लाखो शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. याचा शेतकऱ्यांना नाही तर उद्योगपतींना फायदा होणार आहे. हे सरकार बहिरे आहे पण भांडवलदारांच्या बाजूने असलेल्या या सरकारला निर्णय घेण्यास आम्ही भाग पाडूच, असा इशाराच येचूरी यांनी दिला.