देशात आणि राज्यात चाललेल्या राजकारणामुळे राज्यशास्त्राचे स्वरूप बदलत चालले आहे. फोडाफोडी आणि ‘सत्ताधारीच हा विरोधी पक्ष’ या सिद्धांतांचा समावेश राजकारणात झाला आहे. तत्व-निष्ठा वैगेरे चुलीत असे मानणारा मतदार उदयास आला आहे. व्हॉटसअप, फेसबुकवर फिरणारे बदनामीकारक संदेश खरे वाटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि इतर डावे-आंबेडकरी पक्ष या देशप्रेमी पक्षांमुळेच आदर्श राजकारण टिकून राहिले आहे. वैचारिक बांधिलकी आणि पक्षाशी निष्ठा, देशासाठी कार्य याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे लाखो कॉम्रेड बांधील राहिले आहेत. मोर्चा, संप, आंदोलने ही लोकशाहीतील आयुधे वापरून या पक्षाने नेहमीच सरकारला हादरवले आहे. नुकताच काढलेला शेतकरी मोर्चा हे त्याचेच उदाहरण आहे. येथे, एक गोष्ट लक्षात घ्यावीशी वाटते की या पक्षाने मोर्चाचे श्रेय अजिबात घेतले नाही. तर किसान सभेला याचे श्रेय देऊन टाकले. यावरूनच हा पक्ष राजकारण न करता केवळ समाजकारणाला महत्व देतो, हे सिद्ध होते. आपल्या समोरचा विरोधी पक्ष साम-दाम-दंड-भेद वापरून राजकारण करत आहे. हे माहीत असूनही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने राजकारणाची आदर्श चौकट बदललेली नाही. महाराष्ट्रात अवस्था बिकट असताना देखील पक्षात नैराश्य आलेले दिसत नाही. याचे कारण हा पक्ष खरे कार्यकर्ते घडवतो. जो निवडणुकीच्या तोंडावर फुटत नाही. पळपुटेपणा करत नाही. इतर पक्षाचे कार्यकर्ते, नेते पहा. संधीसाधू राजकारण करतात. विशिष्ट पक्षात जाऊन पदे मिळवतात. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेडस अशा कोणत्याही आमिषाला बळी पडत नाहीत. म्हणूनच हा पक्ष आणि त्याच्या संघटना श्रमिकांच्या मनात घर करून राहिला आहे.
-प्रशांत गायकवाड